गैरप्रकार रोखण्यासाठी ‘नाकाबंदी’ तुरळकच

By admin | Published: February 20, 2017 03:24 AM2017-02-20T03:24:08+5:302017-02-20T03:24:08+5:30

महापालिका निवडणुकीच्या प्रचारातच उडालेला पैशाचा धुरळा आणि पुण्यातील राजकीय चुरस पाहता मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होणार

'Blockade' to prevent malpractices | गैरप्रकार रोखण्यासाठी ‘नाकाबंदी’ तुरळकच

गैरप्रकार रोखण्यासाठी ‘नाकाबंदी’ तुरळकच

Next

पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचारातच उडालेला पैशाचा धुरळा आणि पुण्यातील राजकीय चुरस पाहता मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होणार असल्याची शक्यता सर्वांकडूनच वर्तविण्यात येत आहे. मात्र, पोलिसांकडून नाकाबंदी तुरळक ठिकाणीच करण्यात येणार असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. रात्री अकरा ते दोन वाजेपर्यंत नाकाबंदीचे नियोजनही पोलिसांनी केले होते. मात्र, मधल्या काळात हे प्रकार घडल्यास काय? हा प्रश्न निर्माण झाला.
जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे़ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली़ ‘लोकमत’च्या टीमने रविवारी रात्री शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोटारीतून केलेल्या पाहणीत पोलिसांची नाकाबंदी तुरळक ठिकाणीच आढळून आली. सोमवारी आणि मंगळवारी ड्राय ड्रे असल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील वाईन शॉपच्या बाहेर मद्य खरेदीसाठी गर्दी उसळलेली दिसून आली़
नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि विधान परिषद निवडणुकीच्या काळात पोलीस व महसूल विभागाने जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली होती़ त्यात अनेक वाहनांमधून पैशांची वाहतूक होत असल्याचे आढळून आले होते़ या तपासणीत सापडलेल्या नोटा जप्त करून त्याची माहिती आयकर विभाग व निवडणूक आयोगाला देण्यात आली होती़
सध्या जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत़ प्रचाराच्या या काळात मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर सुरू असल्याचे सांगितले जाते़ मात्र, तपासणीमध्ये पैशांची वाहतूक करताना पकडल्याच्या घटना अद्याप समोर आलेल्या नाहीत. रविवारी प्रचाराची मुदत संपली असून, मंगळवारी मतदान होणार आहे़ या मधल्या काळात मतदारांना प्रलोभने दाखविली जातात़ त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर पोलीस दलाकडून शहरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात खरोखरच नाकाबंदी करण्यात येत आहे का?, वाहनांची तपासणी केली जात आहे का? याची पाहणी ‘लोकमत’च्या टीमने रविवारी रात्री केली़ बाणेर, बालेवाडी, मुंबई- बंगळुरू महामार्ग, कोथरूड, वारजे, सातारा रस्ता, सहकारनगर, स्वारगेट, सिंहगड रस्त्यावर ही पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान राजाराम पुलावर एकाच ठिकाणी बॅरिकेटिंग करून नाकाबंदी करण्यात आलेली होती. याठिकाणी चारचाकी आणि दुचाकींची तपासणी करण्यात येत होती.

राजकीय पक्षाचे फलक हटवले
४बाणेर येथे उमेदवारांनी सुरू केलेल्या निवडणूक कार्यालयांवरील पक्षांचे फलक उतरवण्यात आले होते. मात्र, मतदारांना त्यांचे मतदार यादीतील नाव शोधून दिले जात होते़ तसे फलकही तेथे लावण्यात आले होते. जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ही ‘सेवा’ सुरू केली होती.
४मतदारांकडून नाव व मोबाईल नंबर लिहून घेतला जात होता़ त्याच वेळी मतदान यंत्राच्या प्रतिकृतीवर उमेदवाराचा अनुक्रमांक, चिन्ह याची माहिती मतदारांना दिली जात होती. अशा प्रकारे कार्यकर्त्यांकडून छुपा प्रचारही सुरू होता.
४पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना रात्री अकरा ते पहाटे दोन वाजेपर्यंत नाकाबंदी आणि कोंबिंग आॅपरेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, रात्री उशिरा पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले. सोमवारी सकाळी मतदानयंत्र वाटपापासून त्यांच्या बंदोबस्ताला सुरुवात होणार आहे.

Web Title: 'Blockade' to prevent malpractices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.