पुण्यात रात्री दहानंतर नाकाबंदी; गणेश दर्शनासाठी गर्दी वाढू लागल्यानं विनाकारण फिरणाऱ्यांची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 09:47 PM2021-09-15T21:47:28+5:302021-09-16T19:49:37+5:30
प्रशासनाकडून गणेशोत्सव काळात मध्यवर्ती भागात गर्दी करू नका असे विविध मार्गाने जनजागृती करून सांगितले जात असताना मध्यवर्ती भागात गर्दी होत असल्याचे पहायला मिळत आहे
पुणे : गौरीबरोबरच पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारपासून रस्त्यावरील गर्दी वाढली असल्याने रात्री दहानंतर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात भाविकांची गर्दी अधिक होत असल्याने या भागात रात्री दहानंतर कडक नाकाबंदी केली जाऊ लागली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात कडक नाकाबंदी करण्यात येणार असून दहानंतर स्थानिक रहिवासी व वैध्य कारणाशिवाय फिरणाऱ्या व्यतिरिक्त इतरांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी दिली.
प्रशासनाकडून गणेशोत्सव काळात मध्यवर्ती भागात गर्दी करू नका असे विविध मार्गाने जनजागृती करून सांगितले जात असताना मध्यवर्ती भागात गर्दी होत असल्याचे पहायला मिळत आहे. याच कारणास्तव शिवाजी महाराज रस्ता आणि बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार बंद ठेवला जात आहे. मध्यवर्ती भागातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. ही गर्दी गणेशोत्सवापर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून आता कडक नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आता विनाकारण फिरणाऱ्यांकडे पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. शहरातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी पॉईंट करण्यात आले असून प्रत्येक नाकाबंदी पॉईंटवर दहानंतर विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. शहरातील टिळक रोड वाहतुकीसाठी मोकळा असणार असून शहरातील मध्यवर्ती भागात जाताना मात्र नागरिकांची चौकशी करण्यात येणार आहे.
शिवाजी रोड, बाजीराव रोडवरील वाहतूक बदल
मध्य वस्तीत नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने मंगळवारी सायंकाळपासून पीएमपी बस तसेच जड वाहनांना स. गो. बर्वे चौकातून स्वारगेटच्या दिशेने जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता मार्गे पुढे जावे. स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणार्या बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पुरम चौकातून वळविण्यात येईल, वाहने स्वारगेट, सारसबाग, पुरम चौक, टिळक रस्ता, टिळक चौक, खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने पुढे जाता येईल. नगर रस्त्यावरून स्वारगेट कात्रजला जाण्यासाठी पुणे स्टेशन येथून नेहरू रस्त्याने सेव्हन लव्ह चौकातून स्वारगेटकडे किंवा मार्केटयार्डकडे जाता येईल.
''शहरातील मध्य वस्तीत भाविकांची गर्दी वाढू लागल्याने मंगळवारी रात्री दहानंतर या परिसरात नाकाबंदी करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणार्या नागरिकांची चौकशी करुन त्यांना परत पाठविण्यात येत आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करुन स्वत:ची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर घोळक्याने फिरु नये असं पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी सांगितलं आहे.''