जिल्ह्यात सर्व तालुक्यांत बुधवारी महारक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:42+5:302021-09-21T04:11:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दर वर्षी पावसाळा कमी होत असताना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तापमानामध्ये वाढ होऊन डेंग्यू, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दर वर्षी पावसाळा कमी होत असताना सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात तापमानामध्ये वाढ होऊन डेंग्यू, चिकुनगुणिया, मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होते. या सर्व आजारांमध्ये रुग्णांना रक्ताची गरज वाढते. परंतु कोरोना महामारीमुळे रक्ताचा पुरवठा कमी होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन येत्या बुधवार, (दि.२२) रोजी एकाच दिवसात संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
जिल्ह्याच्या नुकत्याच झालेल्या कोरोना आढावा बैठकीत दर वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात डेंग्यू, चिकुनगुणिया, मलेरिया रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे येत्या काळात जिल्ह्यासह राज्यात रक्ताच्या मागणीत वाढ होते. परंतु गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही दिवसांत ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे संकल्पनेतून सद्य:स्थितीत पोलीस विभाग व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे होतील.
पुणे जिल्ह्यामध्ये रक्तपेढ्यांमध्ये झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी सर्व तालुक्यांमध्ये एकाच दिवशी विशेष रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.