मुस्लीम महिलांचेही रक्तदान महायज्ञात योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:09 AM2021-07-19T04:09:10+5:302021-07-19T04:09:10+5:30
महिलांना मुस्लीम समाजाने रक्तदानासाठी दिलेले प्रोत्साहन हा शहरात चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ...
महिलांना मुस्लीम समाजाने रक्तदानासाठी दिलेले प्रोत्साहन हा शहरात चर्चेचा विषय ठरला. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा रूपाली पाटील-ठोंबरे, स्वारगेट पोलीस विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी रक्तदान शिबिरात उपस्थिती लावत या महिलांचा उत्साह वाढविला.
याबद्दल शाहीन शेख म्हणाल्या, 'लोकमत'ने पुणे शहर मुस्लीम समाजाला रक्तदान करण्यासाठी साद घातली असून आपल्याला या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, असा निरोप आम्हाला मिळाला. हे पुण्याचे काम असल्याने मुस्लीम कुटुंबातील महिलांनीही सहभागी व्हायचे ठरविले. त्यानुसार या नियोजनात आम्हीही भाग घेतला. सबिहा शेख आणि परवीन शेख म्हणाल्या, आम्हाला रक्तदान करण्याची संधी मिळाली. आम्ही आमच्या धार्मिक पद्धती आणि रितीरिवाज पाळतो. मात्र, देश आणि समाज यासाठी आम्ही सदैव आपुलकीच्या नात्याने काम करीत असतो.
----
मुस्लीम महिलादेखील पठडी बाहेरचे काम करू शकतात. समाज आज पुरोगामीत्वाकडे वाटचाल करीत आहे. शिक्षण, तंत्रज्ञान, क्रीडा, कला, साहित्य, सरकारी अधिकारी अशा कोणत्याच क्षेत्रात मुस्लीम महिला मागे नाहीत. आजच्या रक्तदान महायज्ञातही महिला मागे हटल्या नाहीत. त्यांनी रक्तदानाची तयारी दर्शविली आणि त्या उपस्थित राहिल्या ही मोठी गोष्ट आहे.
- फारेहा सय्यद, प्रीन्सिपल, न्यू ग्रेस इंग्लिश हायस्कूल
----