‘ससून’ला विद्यार्थ्यांकडून रक्ताची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:45 AM2018-07-15T00:45:56+5:302018-07-15T00:46:05+5:30
ससून रुग्णालयात नेहमीच रक्ताचा तुटवडा असतो. त्यामुळे तेथील नातेवाइकांना इतर ठिकाणाहून रक्त आणण्यासाठी धावपळ करावी लागते.
पुणे : ससून रुग्णालयात नेहमीच रक्ताचा तुटवडा असतो. त्यामुळे तेथील नातेवाइकांना इतर ठिकाणाहून रक्त आणण्यासाठी धावपळ करावी लागते. गेल्या दोन दिवसांत ससूनमध्ये रक्ताची गरज होती. याची माहिती काही विद्यार्थ्यांना मिळाली तेव्हा त्यांनी रक्तदान करण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगून रक्तदानही केले. सुमारे ४२ जणांचे रक्त या वेळी संकलित करण्यात आले.
ससून रुग्णालयात दररोज पाच हजारांहून अधिक रुग्ण येतात. त्यातील अनेकांना रक्ताची गरज भासते. सुमारे पाचशे ते सहाशे जणांना रक्त हवे असते; परंतु ते ससूनच्या रक्तपेढीत मिळत नाही. ससूनमधील रक्तपेढीत संकलित होणाऱ्या रक्तापैकी सुमारे ८० ते ९० टक्के साठा हा थॅलेसेमियाचे रुग्ण, कैदी, गरीब रुग्ण आदींसाठी वापरला जातो. त्यामुळे इतर रुग्णांना रक्ताचा पुरवठा मुबलक होत नाही. परिणामी, दोन दिवसांपूर्वी ससूनमध्ये २५ बाटल्या रक्ताची गरज होती. याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही तरुणांना समजली. त्यांनी त्वरित ससूनच्या रक्तपेढीशी संपर्क साधून ‘आम्ही रक्तदान करायला तयार आहोत,’ असे सांगितले. तेव्हा ससून रक्तपेढीने विद्यापीठातच शिबिर आयोजित केले. या वेळी सुमारे ४२ जणांचे रक्त संकलित केले.
भारतीय विद्यार्थी काँग्रेस व ससून रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने शिबिर झाले. सतिश पवार व मोहिनी जाधव या दोघांनी पुढाकार घेतला. तसेच या वेळी भूषण राणभरे, रोहन शेट्टी, अमीर पठाण, संतोष डोंगरे, मान पाटील, उमेश कुंभार, रुकसना शेख, अर्चना डुमुरे, राहुल थिटे आदींनी सहकार्य केले.