रक्त आटले
By admin | Published: May 12, 2014 02:34 AM2014-05-12T02:34:12+5:302014-05-12T02:34:12+5:30
यंदाच्या उन्हाळ्यात निवडणुकीच्या धामधुमीमुळे रक्तदान शिबिरेच होऊ न शकल्याने रक्ताची मागणी पुरविणार्या रक्तदात्यांची उणीव रक्तपेढ्यांना भासत आहे
पुणे : यंदाच्या उन्हाळ्यात निवडणुकीच्या धामधुमीमुळे रक्तदान शिबिरेच होऊ न शकल्याने रक्ताची मागणी पुरविणार्या रक्तदात्यांची उणीव रक्तपेढ्यांना भासत आहे. ठरवून करावयाच्या अनेक शस्त्रक्रिया, ‘प्लॅन्ड सर्जरी’ सुट्ट्यांचा काळ पाहून केल्या जातात. उन्हाळ्यात दीर्घ सुट्टी मिळत असल्याने अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचे दिवस राखून ठेवलेले असतात; मात्र त्यासाठी आवश्यक रक्त याच काळात उपलब्ध होत नसल्याची खंत रक्तपेढ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
उन्हाळ्यातील महाविद्यालयांच्या सुट्यांचा फटका दरवर्षी रक्तपेढ्यांना जाणवत असतो, यंदा निवडणुकीच्या आचारसंहितेची त्यातच भर पडली आहे. ऐनवेळच्या शस्त्रक्रिया, सिझर, अपघाताच्या रुग्णांना, थॅलेसेमिया आणि सिकलसेलच्या रुग्णांना तत्काळ रक्ताची आवश्यकता भासते. रक्त मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. ४मागणीनुसार रक्तपुरवठा व्हावा यासाठी बाराही महिने विविध महाविद्यालये, संस्था, आयटी क्षेत्रात रक्तदान शिबिरे राबविण्यात येतात. रक्ताचा साठा कितीही मुबलक असला तरी, रक्ताची मागणीही तितक्याच मोठ्या प्रमाणात होत असल्याने ‘बूंद जिंदगी’ देण्यासाठी शिबिरांचा आधार घेतला जातो. ऐच्छिक रक्तदान करणारे रक्तपेढ्यांवर येऊन रक्तदान करीत असतात. मात्र जनजागृती वाढून लोकांना सामाजिकदृष्ट्या उद्युक्त करण्यासाठी विविध ठिकाणी सामाजिक भूमिकेतून शिबिरे घेतली जातात. महाविद्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणात शिबिरे होतात. मात्र उन्हाळ्यात ही परिस्थिती वेगळी ठरते.
आचार्य आनंदॠषीजी पुणे रक्तपेढीच्या हिना गुर्जर म्हणाल्या, महाविद्यालयांच्या सुट्ट्यांचा फटका रक्तपेढ्यांना दरवर्षी जाणवतो. शिबिरे घेऊ शकत नसल्याने कितीही रक्त उपलब्ध केले तरी मागणीइतका पुरवठा नसतो. त्यामुळे तुटवडा जाणवतोच. या दिवसांत प्लान्ड सर्जरी खूप होतात, त्यांना रक्तपुरवठा करावा लागतो आणि ऐनवेळची रक्ताची गरजही कायम असतेच. याच गोष्टीला केईएम रक्तपेढीच्या प्रतिनिधींनीही दुजोरा दिला.
उन्हाळ्यात लग्नसराईचाही काळ असल्याने स्थानिक बाहेरगावी तर बाहेरगावचे शहरात आलेले असतात. त्यामुळे शिबिरांना प्रतिसाद लाभत नाही. यंदा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शिबिरेही होऊ शकली नाहीत. मागील १५ दिवसांपूर्वी रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता; मात्र आता शिबिरांना सुरुवात होऊन पुरवठा पूर्ववत होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती रक्तपेढीच्या प्रतिनिधीने दिली.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान करण्यास कुणीही पुढे येत नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे रक्तपेढ्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या स्थितीत ‘निगेटिव्ह’ ग्रुपच्या रक्ताचा मोठा तुटवडा आहे.
उन्हाळ्यात रक्त दिल्यानंतर थकवा येतो, पुन्हा रक्त तयार होत नाही, रक्तदान केल्यानंतर दिवसभर काही काम जमत नाही आदी अनाठायी गैरसमजामुळे बहुतांश निरोगी लोक रक्तदान करत नाहीत. मात्र हे गैरसमज दूर करून रक्तदान केल्यास रुग्णांना जीवनदान मिळेल.