रक्ताचाही बाजार? पुण्यातील रक्तपिशव्यांची परराज्यांत चढ्या भावाने विक्री, रक्ताचा प्रचंड तुटवडा
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: May 26, 2024 06:28 PM2024-05-26T18:28:41+5:302024-05-26T18:28:57+5:30
पुणे जिल्ह्यात सरकारी व खासगी अशा एकूण ४६ रक्तपेढ्या असून येथे केवळ साडेपंधरा हजार पिशव्या शिल्लक
पुणे : पुण्यात पाणीटंचाई भीषण आहेच, आता रक्ताचा तुटवडा जाणवत असून ही समस्या गंभीर बनण्याचा धाेका निर्माण झाला आहे. त्याचवेळी दुसरीकडे पुण्यातील रक्तपेढ्या अन्य राज्यातील रक्तपेढ्यांना चढ्या भावाने रक्तपिशव्यांची विक्री करत असल्याचा आराेप हाेत आहे. याची सत्यता तपासून वेळीच कारवाई करण्याबराेबर रक्त विक्रीवर निर्बंध लादले पाहिजे, असे मत व्यक्त केले जात आहे.
शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिळून सरकारी व खासगी अशा एकूण ४६ रक्तपेढ्या आहेत. येथे केवळ साडेपंधरा हजार पिशव्या शिल्लक आहेत. परिणामी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना रक्त उपलब्ध हाेत नसल्याने रक्ताचा खासकरून लाल रक्तपेशी या घटकाचा पुण्यात प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.
पुण्याची लाेकसंख्या आज राेजी काेटीच्या पुढे आहे. त्यानुसार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही प्रचंड आहे. शरीरात रक्त कमी पडले असेल, शस्त्रक्रिया करायची असल्यास, अपघात झाल्यास किंवा इतर काेणत्याही कारणाने शरीरात रक्ताची कमतरता भासल्यास त्या रुग्णाला दुसऱ्या रक्तदात्याने दिलेले रक्त चढवण्यात येते. त्यापूर्वी ते रक्त पेढ्यांमध्ये विविध चाचण्या पार करून याेग्य असल्याची खात्री केली जाते. सध्या या रक्ताचा तुटवडा प्रचंड जाणवत आहे.
महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर दरराेज राज्यात काेणत्या रक्तपेढीमध्ये किती रक्तसाठा आहे याची आकडेवारी अपडेट केली जाते. त्या माहितीनुसार ससूनसारख्या पुण्यातील सर्वांत माेठ्या सरकारीरक्तपेढीतही रक्ताचा तुटवडा आहे.
वास्तव काय ?
- ससूनमध्ये ए पाॅझिटिव्ह किंवा ए निगेटिव्ह असलेल्या लाल रक्तपेशीची पिशवी शिल्लक नाही.
- औंध जिल्हा रुग्णालयासह सह्याद्री, केईएम आदी रुग्णालयांतही रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. प्लाझमाची संख्या पुरेशी आहे.