शीर धडावेगळे करून एकाचा खून
By admin | Published: May 13, 2017 04:29 AM2017-05-13T04:29:43+5:302017-05-13T04:29:43+5:30
अज्ञात व्यक्तीचा खून करून त्याचे शीर (मुंडके) धडापासून वेगळे करून पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने मृतदेह (धड) हे पिशव्यांमध्ये टाकून पिशव्या बांधून
लोकमत न्यूज नेटवर्क
अवसरी : अज्ञात व्यक्तीचा खून करून त्याचे शीर (मुंडके) धडापासून वेगळे करून पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने मृतदेह (धड) हे पिशव्यांमध्ये टाकून पिशव्या बांधून चांडोली खुर्द गावाजवळील घोडनदीपात्रात टाकून दिले. ज्या अज्ञात व्यक्तीने खून केला आहे त्याच्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. १२) घोडनदीत एक सफेद रंगाची गाठोडे असलेली पिशवी ग्रामस्थांना दिसली. संशय आल्याने पोलीसपाटील लहू इंदोरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनी केला. पोलीस आल्यानंतर गाठोडे असलेली पिशवी पाण्याबाहेर काढली. या पिशवीत तीन छोट्या पिशव्या होत्या. त्यामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह होता. मृतदेह बाहेर काढला असता त्याचे दोन्ही हाताची मनगटे व दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून दोरीने बांधलेले होते. मृताच्या अंगात नेसणीतील काळसर रंगाचे अंतर्वस्त्र व बनियन होते. मृताच्या आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु अज्ञात व्यक्तीचा शोध लागला नाही. अज्ञात व्यक्तीने कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे अज्ञात पुरुषाचा (वय २५ ते ३०) खून करून त्याचे शीर धडावेगळे करून घोड नदीत टाकून दिले आहे. मंचर पोलीस ठाणे अज्ञात मृत कोण आहे, याचा व अज्ञात खून करणाऱ्या व्यक्तीचा तपास करीत आहे.