कोथरूडमध्ये एकाचा प्रेमसंबंधांतून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:33 AM2019-02-24T00:33:51+5:302019-02-24T00:33:59+5:30
एकाला अटक : येथील कचरा डेपोत आढळला होता मृतदेह
पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोथरूड कचरा डेपोजवळ टाकण्यात आलेल्या मृतदेहाविषयी निर्माण झालेले गूढ अखेर प्रकाशात आले आहे. प्रेमसंबंध हा या खुनामागील कळीचा मुद्दा ठरल्याचे समोर आले आहे. कोथरूड पोलीस प्रशासनाने मयत व्यक्तीची ओळख पटवून खून करणाऱ्यास अटक केली आहे.
जयराम परमार असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर सुभाष गोविंद जोरी ( ५0, रा. कोथरूड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड कचरा डेपोमध्ये एका खड्ड्यात पोत्यात हात पाय बांधलेल्या अवस्थेतील एक मृतदेह १५ फेब्रुवारी रोजी आढळला होता. एका नागरिकाने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कोथरूड पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नोंद करण्यात आली. पोलिसांनी याचा तपास सुरूकेला तेव्हा मयत हा कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंगमधील व्यक्ती असल्याचे समोर आले. त्यावरून त्याच्या नातेवाइकांना बोलवून पोलिसांनी ओळख पटविली. तेव्हा ती व्यक्ती सुभाष गोविंद जोरी (कोथरूड) असल्याचे समोर आले. शवविच्छेदन अहवालात त्यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे त्यांचा कुणीतरी खून केल्याचा संशय पोलिसांना आला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप गायकवाड, पोलीस आदिनाथ खरात, सहायक पोलीस फौजदार दत्ता शिंदे, कर्मचारी विलास जोरी, राकेश टेकवडे, श्रावण शेवाळे, रानवडे, यांच्या पथकाने केली.
गळा दाबून पोत्यात बांधले
१ तपास करत असताना जोरी यांना कोणीतरी एका व्यक्तीने गाडीवर बसवून नेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी जोरी याच्या घराजवळ व कामाच्या ठिकाणाजवळ तपास केल्यावर पोलीस शिपाई राकेश टेकवडे यांना माहिती मिळाली की, सुभाष जोरी यांचा खून जयराम परमार याने केला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेतला. तेव्हा परमार हा किष्किंधानगर परिसरातील डोंगर परिसरात मिळून आला.
२ तेव्हा त्याच्याकडे तपास केल्यावर त्याचे जोरी याच्या सुनेसोबत प्रेमसंबंध असल्याने त्यास तो अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याला कामानिमित्त दुचाकीवर सोबत नेऊन त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुल दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे हातपाय बांधून पोत्यात बांधले व ते कचरा डेपो येथे नेऊन टाकला.