मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे ‘रक्ताचे नाते’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:55 AM2018-06-15T03:55:46+5:302018-06-15T03:55:46+5:30
अपघात झाल्यानंतर एखाद्या रुग्णाला किंवा रुग्णावर शस्त्रक्रिया करायची असेल, तर त्वरित रक्ताची गरज असते. तेव्हा ते लगेच उपलब्ध होणे आवश्यक असते. ते लवकर मिळावे, यासाठी ४ विद्यार्थ्यांनी मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे.
पुणे - अपघात झाल्यानंतर एखाद्या रुग्णाला किंवा रुग्णावर शस्त्रक्रिया करायची असेल, तर त्वरित रक्ताची गरज असते. तेव्हा ते लगेच उपलब्ध होणे आवश्यक असते. ते लवकर मिळावे, यासाठी ४ विद्यार्थ्यांनी मोबाईल अॅप्लिकेशन तयार केले आहे. यामध्ये ज्याला रक्त हवे आहे, त्याला एका क्लिकवर रक्त कुठे उपलब्ध आहे ते समजेल. तसेच, ते त्याला इच्छित स्थळी मिळणार आहे.
सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये बी.ई. कॉम्प्युटरच्या अंतिम वर्षाला असणाऱ्या पीयूष शहा, राजकुमार पाटील, मृणाल टिळेकर व चिन्मयी येरागी या विद्यार्थ्यांनी हे अॅप्लिकेशन तयार केले आहे. त्यांना प्रा. धनंजय गायकवाड आणि प्रा. पूनमकुमार हनवटे यांनी मार्गदर्शन केले आहे. जागतिक रक्तदान दिनानिमित्त ‘रक्ताचे नाते ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राम बांगड यांच्या हस्ते या अॅप्लिकेशनचे उद्घाटन करण्यात आले. लव्ह केअर शेअर फांउडेशनचे सहकार्य मिळाले आहे.
पीयूष शहा आणि त्याचे मित्र रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. तेव्हा त्यांना रक्त हवे असेल तर ते त्वरित मिळावे, तसेच रक्तदात्यांची माहिती मिळावी आदी बाबी नसल्याचे जाणवले. त्यामुळे रक्तदानाबाबत ‘ब्लड रिक्वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ या नावाने मोबाईल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. त्यामध्ये ज्यांना रक्त हवे आहे, त्यांना लॉगिन करावे लागणार आहे. लॉगिन करण्यासाठी त्यांना ओटीपी मिळेल. कारण या अॅप्लिकेशनचा गैरवापर होऊ नये, यासाठी ओटीपीचा आॅप्शन दिला आहे. जीपीएसद्वारे ब्लड कुठपर्यंत आलं आहे, ते समजणार आहे. ओटीपी मिळाल्यानंतर लगेच संबंधिताला मोबाईलवर मेसेज मिळेल, की कुठे-कुठे रक्त उपलब्ध आहे. तसेच संबंधित रक्तपेढीलासुद्धा त्या गरजू व्यक्तीची माहिती जाणार आहे.
संपूर्ण माहिती क्लिकवर
रक्तदात्याची संपूर्ण माहितीदेखील या सिस्टीममध्ये असेल. त्यामुळे कुठेही रक्तदान करताना दोन-तीन पानांचा फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. एका क्लिकवर संपूर्ण माहिती मिळणार आहे. तसेच, परिसरातील सर्व ब्लड बॅँकांना देखील यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे. गरजूंना त्याच्या २५ किलोमीटरच्या परिसरातील ब्लॅँड बॅँकांची माहिती या सिस्टीममध्ये मिळणार आहे.
टिप्सची माहिती
भविष्यात होणाºया शिबिरांची माहिती या सिस्टीममध्ये दिसणार आहे. तसेच, रक्तदान करण्यासाठीच्या टिप्स, कोण रक्तदान करू शकते, रक्तदानापूर्वीची काळजी, रक्तदान केल्यानंतरची काळजी आदींबाबतचे मार्गदर्शन या सिस्टीममध्ये आहे. या सिस्टीममध्ये प्रत्येक पानावर कॉलचे बटण आहे. कारण, ज्यांना अॅप्लिकेशनमधील माहिती समजत नसेल, ते कॉल करून काय करायचे ते समजून घेऊ शकतात.