रक्तदात्यांचे प्रमाण वाढूनही भासतेय रक्ताची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2015 11:57 PM2015-06-13T23:57:22+5:302015-06-13T23:57:22+5:30

रुग्णालयात दाखल होणाऱ्या सर्वच रुग्णांना रक्ताची गरज असते. त्या प्रमाणात रक्तसंकलन होण्याचे प्रमाण कमी आहे.

Blood transfusion may increase due to lack of blood | रक्तदात्यांचे प्रमाण वाढूनही भासतेय रक्ताची कमतरता

रक्तदात्यांचे प्रमाण वाढूनही भासतेय रक्ताची कमतरता

Next

मिलिंद कांबळे,  पिंपरी
रुग्णालयात दाखल होणाऱ्या सर्वच रुग्णांना रक्ताची गरज असते. त्या प्रमाणात रक्तसंकलन होण्याचे प्रमाण कमी आहे. विशेषत: उन्हाळ्यात रक्ताची कमतरता भासते. दुसरीकडे सुशिक्षित नागरिक, विद्यार्थी, आयटी अभियंते, कामगार यांच्यामध्ये रक्तदानाचे प्रमाण वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. मात्र, हे प्रमाण पुरेसे नसल्याचे मत रक्तपेढी संचालकांनी व्यक्त केले.
अपघात, शस्त्रक्रिया, उपचार आदी कारणांसाठी रक्ताची सर्वाधिक गरज भासते. रुग्णालयात दाखल होणाऱ्या दहापैकी ७ रुग्णांना रक्ताची गरज भासते. तसेच, अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर महापूर, भूकंप, बॉम्बस्फोट आदी आपत्कालीन परिस्थिती, साथीचे आजार यांत रक्ताची तातडीने मोठ्या प्रमाणात गरज भासते. रक्ताची मागणी नेहमीच असते. मात्र, त्या प्रमाणात त्याचा पुरवठा होण्याचे प्रमाण कमी आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थी, सुशिक्षित नागरिक, आयटी अभियंता, तसेच कामगारांमधून रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. महाविद्यालय, सार्वजनिक मंडळ, संस्था, कारखाने, कामगार संघटना आदींच्या माध्यमातून वर्षभरात रक्तदान शिबिरे भरविली जातात. या माध्यमातून रक्ताची गरज भागविली जाते. रक्तासाठी पूर्वी पुणे शहरातील रक्तपेढ्यांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे.
रक्तदान केल्यास रक्तदानाचे प्रमाणपत्र व कार्ड मिळते. त्या रक्तदात्यास वर्षभर सवलतीत किंवा मोफत रक्त दिले जाते.
थॅलसेमिया रुग्णांच्या शरीरात रक्त तयार होत नाही. त्यामुळे त्यांना दररोज रक्त चढवावे लागते. अशा रुग्णांना मोफत रक्त पुरविले जाते. अशा रुग्णांना पीएसआय रक्तपेढीतून दर वर्षी ११० पिशव्या मोफत दिल्या जातात.
सामाजिक संस्था, मंडळ, कारखाने, कामगार संघटना, महाविद्यालय, लोकप्रतिनिधी आदींना भेटून रक्तदान शिबिर घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते. शिबिरासाठी संबंधित संस्थेला काहीच खर्च येत नाही. सर्व खर्च रक्तपेढी करते. दर वर्षी नियमितपणे शिबिर घेणारे अनेक मंडळ, कारखाने, कामगार संघटना आहेत. नुकतेच माथाडी कामगार संघटनेच्या शिबिरात १९५ कामगारांनी रक्तदान केले. पिंपळे गुरव येथील नगरसेवक नवनाथ जगताप यांच्यातर्फे झालेल्या शिबिरात २३९ जणांनी सहभाग घेतला. रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यात आणखी वाढ झाली पाहिजे. वर्षभरात १५ हजार पिशव्यांची गरज असते. प्रत्यक्षात १० हजारांपर्यंत संकलन होते, पीएसआय रक्तपेढीचे निरीक्षक सदानंद नाईक यांनी सांगितले.
महाविद्यालय, इन्सिट्युट, एमआयडीसीतील कारखाने, नगरसेवक यांना भेटून रक्तदान शिबिराबाबत जागृती केली जाते. उन्हाळ्यात रक्तांची कमतरता जाणवते. महिन्याला ४०० पिशव्यांची गरज असते. कधी ती पुर्ण होते कधी नाही. महापालिका रुग्णालयाच्या रुग्णासाठी ३१५ ते ३३५ रुपये आणि खासगी रुग्णालयासाठी ७४० ते ८५० रुपये दर आहे, असे क्रांतिवीर चापेकर पेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शंकर मोसलगी यांनी सांगितले.

ओतारी कुटुंबाने केले १५० वेळा रक्तदान
-काकडे पार्क, चिंचवड येथील ओतारी कुटुंब रक्तदानासाठी नेहमीच उत्सुक असते. वय वर्षे ६० असलेले रमेश ओतारी, त्यांचा मुलगा विशाल, सागर आणि सून प्रिया यांनी मिळून १५०पेक्षा अधिक वेळा रक्तदान केले आहे. विशेष म्हणजे त्यांचा रक्तगट ‘ए पॉजिटिव्ह’ आहे. ओतारी यांनी वयाच्या १८व्या वर्षी प्रथम रक्तदान केले. त्यांनी अद्यापपर्यंत १००पेक्षा अधिक वेळा रक्तदान केले आहे. एका बांधकाम व्यावसायिकाच्या रुग्ण मुलीस त्यांनी अनेकदा रक्तदान केले. त्यांची ही सवय त्यांची मुले विशाल व सागर, तसेच सून प्रिया यांनीही पुढे कायम ठेवली आहे.
-‘‘मित्राच्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताची तातडीची गरज होती. त्यामुळे ८ दिवसांत २ वेळा रक्तदान केले होते. रक्तदानाची भीती बाळगण्याचे कारण नाही. रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचविण्याचे मोठे समाधान मिळते. अनेकांनी रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे पुढे यावे,’’ असे रमेश ओतारी यांनी सांगितले.

Web Title: Blood transfusion may increase due to lack of blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.