खंडाळ्यात महिलेचा खून
By admin | Published: May 1, 2016 02:57 AM2016-05-01T02:57:55+5:302016-05-01T02:57:55+5:30
हिल टॉप कॉलनी, खंडाळा येथील एका बंगल्यात माळीकाम करणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री डोक्यात व हातावर जखमा करून खून केल्याची घटना मध्यरात्री १२:३०च्या
लोणावळा : हिल टॉप कॉलनी, खंडाळा येथील एका बंगल्यात माळीकाम करणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा शुक्रवारी रात्री डोक्यात व हातावर जखमा करून खून केल्याची घटना मध्यरात्री १२:३०च्या सुमारास उघड झाली. या प्रकरणी मृत महिलेचे पती जगन्नाथ पांडुरंग मकर (वय ६०, रा. बंगला नं. ६७, हिल टॉप कॉलनी, खंडाळा) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बंगलामालकाच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.
रंजना जगन्नाथ मकर (वय ५५, रा. हिलटॉप कॉलनी, खंडाळा) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. बंगलामालक यांचा ड्रायव्हर चंद्रदेव ऊर्फ चंदन उमेद कामथी याने हा खून केला असल्याचा संशय मृत रंजना यांचे पती जगन्नाथ यांनी फिर्यादीमध्ये व्यक्त केला आहे.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मकर कुटुंब मागील ३० वर्षांपासून हिल टॉप कॉलनी येथील पल्लवी पारेख यांच्या बंगल्यात माळीकाम करीत आहे. शुक्रवारी पारेख यांचा ड्रायव्हर मालकांचे पाहुणे सहारा अॅम्बी व्हॅली येथे सोडून पारेख यांच्या बंगल्यावर राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी सकाळी जगन्नाथ मकर हे नातेवाइकांच्या लग्नासाठी पुण्यातील वाघोली येथे गेले होते. रात्री उशिरा ते ११:३०च्या सुमारास घरी परतले असता, त्यांना पत्नी घरात नसल्याचे आढळले. त्यांनी शेजारच्या बंगल्यात माळीकाम करणारे शेजारी व ड्रायव्हर चंदन यांच्या समवेत बंगल्याच्या परिसरात बॅटरीच्या उजेडात शोध घेतला. बंगल्याच्या मागील कंपाउंडजवळ पाल्यापाचोळ्यात रंजना यांचा मृतदेह मिळून आला. त्यांच्या डोक्यावर व हातावर जखमा होत्या. मृतदेहाच्या अंगावर एकच वस्त्र होते. त्यामुळे लैंगिक अत्याचार करून खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, लैगिंक अत्याचार झाल्याचे खून करणाऱ्याकडून भासविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
मृतदेह सापडल्यानंतर ड्रायव्हर चंदन यांच्याकडे मकर यांनी विचारणा केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. तसेच त्यांच्या हाताला जखमा झाल्या असल्याचे आढळून आल्याने हा खून चालक चंदन यानेच केला असल्याचा आरोप जगन्नाथ मकर यांनी फिर्यादीमध्ये केला होता. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव तपास करीत आहेत.