रिक्षाच्या भाड्यावरून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 01:07 AM2018-06-18T01:07:19+5:302018-06-18T01:07:19+5:30
रिक्षाचे भाडे न दिल्याने झालेला वाद होऊन त्यात मारहाण करून एकाचा खून करण्यात आला़
पुणे : रिक्षाचे भाडे न दिल्याने झालेला वाद होऊन त्यात मारहाण करून एकाचा खून करण्यात आला़ रविवार पेठेत झालेल्या या प्रकारात रिक्षाचालकाने जखमी झालेल्याला स्वत:च्या रिक्षातून ससून रुग्णालयात नेले़ पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने कोणी मारहाण केली हे माहिती नसल्याचे सांगितले़ पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींची तपासणी केल्यावर त्यात रिक्षाचालक व त्याच्या साथीदारानेच मारहाण केल्याचे निष्पन्न झाले़
फरासखाना पोलिसांनी रिक्षाचालक अतुल ऊर्फ ईश्वर दशरथ हराळे आणि त्याचा साथीदार रोहन ज्ञानेश्वर गोडसे (दोघे रा़ रविवारी पेठ) यांना अटक केली आहे़
तानाजी धोंडीराम कोरके (वय ३०, रा़ मूळ रा़ निलंगा, जि़ लातूर) असे खून झालेल्याचे नाव आहे़ ही घटना रविवारी पेठेतील महाराणा प्रताप रोडवर शनिवारी दुपारी पावणेतीन वाजता घडली होती़
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अतुल हराळे यांच्या रिक्षात कोरके हे रविवार पेठेतील कासट दुकानाजवळ बसले़ काही अंतरावरील मोती चौकात ते रिक्षातून उतरले़ त्यांनी रिक्षाचे भाडे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला़ कोरके तसेच निघून गेले़ काही अंतरावर ते हराळे यांना पुन्हा दिसले़ तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे भाड्याचे पैसे मागितले़ तेव्हा हराळे व त्याचा मित्र रोहन गोडसे यांनी कोरके यांना हाताने मारहाण केली़ त्यात ते रस्त्यावर पडल्याने डोक्याला जखम झाली़ त्याची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले़ तेव्हा हे दोघे तेथेच होते़ हराळे यांच्या रिक्षातूनच कोरके
यांना ससून रुग्णालयात नेले़ परंतु, कोरके यांना कोणी मारले हे माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले़
त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यावर त्यात रिक्षाचालक हराळे व त्यांचा मित्र रोहन गोडसे हेच मारहाण करत असल्याचे दिसून आले़ त्यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे अधिक तपास करीत आहेत़