उडाली जळमटे, उजळल्या आठवणी; हुरहुरत्या भाषणांनी महापालिका सभागृहाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 02:56 AM2018-09-18T02:56:27+5:302018-09-18T02:56:54+5:30
सलग ६० वर्षांच्या विविध आठवणींचा पट उलगडत नगरसेवकांनी महापालिकेच्या जुन्या इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाला निरोप दिला.
पुणे : सलग ६० वर्षांच्या विविध आठवणींचा पट उलगडत नगरसेवकांनी महापालिकेच्या जुन्या इमारतीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाला निरोप दिला. सन १९५८ मध्ये या सभागृहाचे उद्घाटन झाले. आता मंगळवारच्या (दि. १८) सभेपासून सर्व नगरसेवक महापालिकेच्या विस्तारित इमारतीमधील नव्या अत्याधुनिक सभागृहात बसतील. पदाधिकाऱ्यांची दालनेही त्याच इमारतीमध्ये असून जुन्या सभागृहाचा चांगला वापर करण्याचा शब्द महापौर मुक्ता टिळक यांनी त्यासाठी आग्रही असलेल्या नगरसेवकांना दिला.
जुन्या इमारतींमधील या सभागृहात काम केलेल्या अनेकांनी थेट केंद्रातील सरकारमध्ये मंत्री होण्यापासून ते खासदार, आमदार, राज्यात मंत्री होण्यासारखी अनेक पदे भूषवली. देशाच्या राजकारणात स्वत:चे नाव केले. मोहन धारिया यांच्यापासून ते विद्यमान पालकमंत्री गिरीश बापट यांच्यापर्यंत अनेकांची नावे या वेळी सदस्यांनी घेतली. त्यामुळेच या सभागृहाचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त म्हणून काम केलेल्या अनेकांच्या आठवणीही या वेळी सदस्यांनी सांगितल्या. राजकीय अडवाअडवी, जिरवाजिरवी, प्रशासनावर कुरघोडी, प्रशासनाचा डाव, नव्या सदस्यांना अडचणीत आणून प्रशिक्षण देणे, वर्चस्व गाजवणाºयांना नंतरच्या निवडणुकीत संधीच न मिळणे, अपेक्षा नसतानाही महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यासारखी पदे मिळणे, अशा अनेक आठवणींनी सभागृह मंगळवारी हरखून गेले. या सभागृहाने बरेच शहाणपण दिले व अनेक गोष्टी लक्षातही आणून दिल्या, उतू नये मातू नये घेतला वसा टाकून नये हा धडा सभागृहानेच अनेक सदस्यांना दिला असे अनेक सदस्यांनी सांगितले.
गोपाळ चिंतल, दिलीप बराटे, माधुरी सहस्रबुद्धे, अविनाश साळवे, अजित दरेकर, भय्या जाधव, योगेश ससाणे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अजय खेडेकर या सदस्यांनी आपल्या नव्याजुन्या आठवणींना उजाळा दिला.
चेतन तुपे म्हणाले, अंदाजपत्रकावरील पहिल्याच भाषणाने कौतुक झाले व पुढे दीड वर्ष हात वर करूनही कधी बोलण्याची संधीच मिळाली नाही.
अरविंद शिंदे म्हणाले, राजकीय प्रशिक्षण या सभागृहातूनच मिळाले. नीला कदम, ज्योत्स्ना सरदेशपांडे यांचे भाषण ऐकून यांच्यासारखे आपल्याला बोलायला यायला हवे असे वाटायचे.
वसंत मोरे यांनी, सभागृहात यायचे असा पणच केला होता व तो यशस्वी झाला असे सांगितले.
उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी समाजातील उपेक्षित वंचित घटकांकडे सभागृहाने नेहमीच आस्थेने पाहिले असे स्पष्ट केले. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सभागृहात आल्यावर मी पणाची भावना कमी होऊन आपण केले, आम्ही केलेची भावना वाढीला लागते असे मत व्यक्त केले. नव्या सभागृहातही याच पद्धतीने खेळीमेळीने काम होईल, असे ते म्हणाले.
टिळक म्हणाल्या, या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली ही मोठी गोष्ट आहे. राजकारण तसेच समाजकारणातील अनेक गोष्टी या सभागृहाने शिकवल्या. त्याचा कायमच उपयोग होईल. सदस्यांना वाटते तसे हे सभागृह मोडणार, तोडणार नाही तर त्याचा विधायक कामासाठी वापर केला जाईल. या सभागृहाचे वैभव जपले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रगीतगायनाने या सभागृहातील या अखेरच्या सभेचे कामकाज संपवण्यात आले.
सभागृहाची रचना : उपराष्टÑपतींकडून कौतुक
मंगळवारी (दि. १८) नव्या सभागृहातील पहिली सभा दुपारी ३ वाजता होणार आहे. उद््घाटनाच्या दिवसापासून हे सभागृह चर्चेत आहे. त्याचदिवशी सभागृहात गळती झाली, त्यानंतर सभागृहाच्या बाजूला असणाºया कक्षात भटके श्वान आढळले, मात्र आता त्या सर्व गोष्टींवर मात करत मंगळवारी पहिली सभा होईल. २५० इतक्या मोठ्या आसनक्षमतेचे हे सभागृह घुमटाकार छताचे आहे. वातानुकूलित, ध्वनिरोधक व गोलाकार आसनरचनेचे आहे. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते त्याचे उद््घाटन झाले व नायडू यांनीही सभागृहाच्या रचनेची स्तुती केली आहे.