हाती निळे झेंडे... मुखी जयभीमचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:02+5:302021-01-02T04:10:02+5:30

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या जनसमुदायाच्या मुखात ‘जयभीम’चा नारा होता. तरुणाइच्या हातामध्ये निळे ...

Blue flags in hand ... slogan of Mukhi Jayabhim | हाती निळे झेंडे... मुखी जयभीमचा नारा

हाती निळे झेंडे... मुखी जयभीमचा नारा

Next

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेल्या जनसमुदायाच्या मुखात ‘जयभीम’चा नारा होता. तरुणाइच्या हातामध्ये निळे झेंडे घेत जोरदार घोषणाबाजी करीत होते. राज्यभरातून मोजक्याच आलेल्या समाजबांधवांनी विजयस्तंभास मानवंदना दिली. दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारा सोहळा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच समाजबांधवांच्या उपस्थितीत मानवंदना व अभिवादन दिवस शांततेत साजरा करण्यात आला.

भीमाकाठावरील कोरेगाव भीमा नजीक ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटना आदी मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेले बांधव सहभागी होते. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले होते.

कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी १ जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज आणि महार रेजिमेंट विरुद्ध पेशवे यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा पाडाव करून विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शूरांना वीरमरण आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी विजयस्तंभ उभारला. १९२७ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आंबेडकरी बांधव १ जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.

परिसरात अत्यंत उत्साहपूर्वक वातावरण प्रशासनाने गेले दोन महिने सातत्याने गाव बैठका घेत सामाजिक सलोखा निर्माण केल्याने मानवंदनेसाठी येणाऱ्या समाजबांधवांमध्ये मोठी ऊर्जा पाहण्यास मिळत होती. राज्यभरासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरयाणा, कर्नाटकसह, आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी समाजबांधव विजयस्तंभाजवळ एकवटला होता.

नागरिकांना विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी मुख्य रस्त्यापासून एका रांगेत सोडण्यात येत होते. पोलिसांनी अभिवादन स्थळावर जाण्यासाठी दोन रांगा तर बाहेर पडण्यासाठी तीन रांगा केल्या होत्या. नागरिकांना विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी मुख्य रस्त्यापासून सॅनिटायझर, तापमान तपासणी करून धातूशोधक यंत्रातून तपासणी करून एका रांगेत सोडण्यात येत होते.

कोरेगाव भीमा येथे गुरुवार रात्रीपासून सुरू झालेला अभिवादन कार्यक्रम आजही सुरू होता. विजयस्तंभास अभिवादन केल्यानंतर वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी जात होते.

पेरणे ग्रामपंचायतीच्या वतीने ३०० स्वच्छतागृह, ११० पिण्याचे पाणी टँकर, भौतिक सुविधा पुरविण्याचे काम केल्याचे सरपंच रूपेश ठोंबरे, उपसरपंच किरण भंडलकर, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुसकर यांनी केली. तर मानवंदनेसाठी आलेल्या भीमसैनिकांचे स्वागत कोरेगाव भीमा विजयरणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, विशाल सोनवणे, सचितानंद कडलक, राजू विटेकर, दिशांत भालेराव, भानुदास भालेराव, प्रवीण म्हस्के, प्रकाश वडावराव, दीपक शिंदे, नितीन कांबळे आदिंनी स्वागत केले.

चौकट : आरोग्य विभागाने बजावली कामगिरी

तळेगाव ढमढेरे व पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने कोरेगाव भीमा व पेरणे परिसरात दहा बाह्यरुग्ण तपासणी केंद्र, पाच अँटिजेन टेस्टिंग, चार कोविड तपासणी केंद्र, २४ रुग्णवाहिकांचे नियोजन करण्यात आल्याचे तळेगाव ढमढेरे केंद्राच्या प्रज्ञा घोरपडे, पेरणे केंद्राचे डॉ. हरीश लोहार आदिंनी माहिती दिली.

--------

गर्दी कमी तरीही प्रत्येक चौकात पोलीस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची संख्या कमी असूनही महामार्गावरील प्रत्येक चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. ड्रोनद्वारे गर्दीवर लक्ष ठेवण्यात येत होते.

---------

प्रशासनाकडून चोख व्यवस्था

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी योग्य नियोजन केले. विजयस्तंभ अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या आरोग्य तपासण्यासाठी कक्ष उभारण्यात आले होते. या सोबतच कोविड सेंटरही उभारले होते. या ठिकाणी आजारी असलेल्यांच्या तपासण्या करण्यात आल्या.

----------

नागरिकांच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष

कोरेगाव भीमा व विजयस्तंभाजवळ पोलीस नियंत्रण कक्ष उभारल्यामुळे गर्दीत हरवले-सापडले यासाठी चांगला उपयोग होत होता. अनेक लहान मुले, मोबाइल, पाकीट सापडलेली या कक्षात पोलीस ज्यांचे आहेत त्यांना देत होती. तसेच समता सैनिक दलाचे जवानदेखील पोलिसांना मदत करत होते. पोलिसांच्या मदतीला असलेले शांतिदूतदेखील गर्दीला दिशादर्शक मदत करत होते.

फोटो : कोरेगाव भीमा नजीक पेरणे फाटा येथे असलेल्या ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आलेला जनसमुदाय.

Web Title: Blue flags in hand ... slogan of Mukhi Jayabhim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.