एम्प्रेस गार्डनच्या पार्किंगमध्ये मिलेशिया वृक्षावर ‘निळे मोती’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 12:16 PM2023-02-27T12:16:59+5:302023-02-27T12:20:17+5:30

एम्प्रेस गार्डनमधील पार्किंगमध्ये मिलेशिया म्हणजेच तुमा हा वृक्ष फुलला आहे...

'Blue pearls' on a Milesia tree in the parking lot of Empress Gardens | एम्प्रेस गार्डनच्या पार्किंगमध्ये मिलेशिया वृक्षावर ‘निळे मोती’

एम्प्रेस गार्डनच्या पार्किंगमध्ये मिलेशिया वृक्षावर ‘निळे मोती’

googlenewsNext

- श्रीकिशन काळे

पुणे : वसंताची चाहूल लागली असून, सृष्टीने कात टाकायला सुरुवात केली आहे. शहरात पानगळ पाहायला मिळत आहे. नवीन पालवी उमलू लागली आहे. वृक्ष अंगावर नवतेचा शालू पांघरून डोलात बहरत असल्याचे दृश्य आजूबाजूला दिसत आहे. एम्प्रेस गार्डनमधील पार्किंगमध्ये मिलेशिया म्हणजेच तुमा हा वृक्ष फुलला आहे. त्यावर मधमाश्याही ताव मारत आहेत.

ऋतूंमध्ये वसंताला राजा मानला जातो. कारण या काळात सर्व सृष्टी फुलून गेलेली असते. जुनी पाने गळून नवीन पाने येत असतात. फुलांना बहर आलेला असतो. उन्हाचा पारा चढत असताना हा निसर्गाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळतो. सध्या विविध वृक्षांना फुले यायला लागली आहेत. आता एकही पान नसलेले आणि केवळ फुलांनी लगडलेले मिलेशिया वृक्ष निळ्या रंगांच्या चिमुकल्या फुलांनी भरून गेले आहे. मिलेशिया हा विदेशी वृक्ष आहे. हा मूळचा ब्रह्मदेश (म्यानमार) आशियाई बेटातील रहिवासी वृक्ष आहे. वनस्पतिशास्त्रज्ञ मिलेट यांच्या स्मरणार्थ प्रजातिनाम म्हणून या वृक्षाला हे नाव आहे. आपल्याकडे सुरुवातीला बंगालमध्ये हा आणला गेला. त्यामुळे त्याला बंगाली नाव आहे. ते म्हणजे तुमा. याचा अर्थ आहे मोत्यांसारखी किंवा रत्नांसारखी फुले गाळणारा. इंग्रजीतही ज्युवेल्स ऑन ए स्ट्रिंग असे नाव आहे. हा वृक्ष भारतात उद्यानवृक्ष म्हणून लावला जातो. करंज वृक्षाशी याचे बरेचसे साम्य पाहायला मिळते, अशी माहिती ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांच्या विदेशी वृक्ष या पुस्तकात नमूद आहे.

या फुलांचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये असतो. औंध परिसरात, स्पायसर कॉलेजमध्ये, एरंडवण्यात मिलेशियाची वृक्ष पाहायला मिळतात. हा वृक्ष नत्रस्थिरीकरण करतो. फुले लोंबणाऱ्या तुऱ्यांप्रमाणे येतात. पूर्ण बहरलेले झाड पाहायचे असेल तर एम्प्रेस गार्डनमधील पार्किंगमध्ये सध्या पाहता येत आहे.
- डॉ. श्रीनाथ कवडे, वनस्पती संशोधक

एम्प्रेस गार्डनमध्ये सध्या बरीच वृक्ष फुलायला लागली आहेत. त्यामध्ये मिलेशियाची वृक्ष चिमुकल्या निळसर फुलांनी लगडलेली आहेत. त्यावर मधमाश्याही मधासाठी येत आहेत.
- प्रशांत चव्हाण, व्यवस्थापक, एम्प्रेस गार्डन

Web Title: 'Blue pearls' on a Milesia tree in the parking lot of Empress Gardens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.