'ब्लूटुथ' ठरला महत्वाचा दुवा; कर्जातून सुटकेसाठी केला मित्राचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 06:26 PM2020-12-21T18:26:05+5:302020-12-21T18:30:47+5:30
सिनेस्टाईल रचला कट : स्टॅम्पपेपर लिहून केला आत्महत्येचा बनाव
पिंपरी : कर्जबाजारी झाल्याने देणेदाऱ्यांच्या तगाद्यापासून सुटकेसाठी कर्जदाराने सिनेस्टाईल कट रचला. १५ वर्षांपूर्वी मैत्री असलेल्या एकाचा खून केला. कर्जबाजारी झाल्याने मी माझा शेवट करीत आहे, असा स्टॅम्पपेपर लिहिला. त्यानंतर फरार झाला. ब्लूटुथ तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
मेहबुब दस्तगरी शेख (रा. राजवाडेनगर, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप पुंडलिक माईनकर (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
बंगळुरू- मुंबई महामार्गावर बाणेर येथे २९ नोव्हेंबर २०२० रोजी जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. घटनास्थळावर अर्धवट जळालेली चिठ्ठी तसेच ब्लूटुथ मिळून आले. त्यावरून सदरचा मृतदेह संदीप माईनकर यांचा असून, खुनाचा प्रकार असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तसेच गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने समांतर तपास सुरू केला.
दरम्यान, काळेवाडी येथील मेहबुब शेख बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली. संशय आला म्हणून पोलिसांनी चाैकशी केली असता शेख हा कर्जबाजारी असून त्याला दोन बायका असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिकबाबींच्या आधारे चाैकशी केली असता आरोपी शेख हा दिल्ली येथे असल्याचे निषप्पन्न झाले. तसेच तो दिल्ली येथून पुणे येथे त्याच्या दुसऱ्या बायकोसोबत रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला दाैंड रेल्वेस्टेशन येथून ताब्यात घेतले. कर्जबाजारी झाल्याने देणेदारांचा ससेमिरा चुकविण्यासाठी संदीप माईनकर याचा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून शंभर रुपयांचा स्टॅम्पपेपर मिळून आला. मी कर्जबाजारी झालेलो असून, मी माझा शेवट करीत आहे, माझी बाॅडी ही बाणेर भागातच मिळेल, असा मजकूर त्याने स्टॅम्पपेपरवर लिहिला असल्याचे दिसून आले.