महापालिकेत जागा झाला जुना दोस्ताना, भाजपा-शिवसेना एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 02:49 AM2017-11-11T02:49:21+5:302017-11-11T02:49:28+5:30
महापालिकेत एकहाती सत्ता मिळाल्यापासून एकदाही न जमलेल्या भारतीय जनता पार्टी व शिवसेनेतील जुना दोस्ताना शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मात्र अचानक जागा झाला
पुणे : महापालिकेत एकहाती सत्ता मिळाल्यापासून एकदाही न जमलेल्या भारतीय जनता पार्टी व शिवसेनेतील जुना दोस्ताना शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मात्र अचानक जागा झाला. जैव विविधता व्यवस्थापन समिती व पालिकेच्या शाळांमध्ये वंदेमातरम्चे गायन या दोन विषयांमध्ये त्यांनी युती केली. काँग्रेसने या प्रकाराची खिल्ली उडवत घ्यायचेच तर उपमहापौरपद तरी घ्यायचे, अशा शब्दांत शिवसेनेला खिजवले.
महापालिकेच्या शाळांमध्ये वंदेमातरम् म्हटले जावे, असा प्रस्ताव शिवसेनेच्या प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे यांनी दिला होता. स्थायी समितीमधून तो मंजूर होऊन सर्वसाधारण सभेसमोर आला. शुक्रवारी झालेल्या सभेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी, या विषयाला विरोध नाही; मात्र त्यात ऐच्छिक हा शब्द टाकावा, अशी उपसूचना दिली.
चेतन तुपे व अरविंद शिंदे यांनी याबाबत आग्रह धरला. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले तसेच भाजपाचे धीरज घाटे वगैरेंनी वंदेमातरम्
ठराव आहे तसाच मंजूर व्हावा, अशी मागणी केली. त्यावरून सभागृहात बराच गोंधळ झाला. त्यामुळे मतदान घेण्यात आले.
त्याआधीच जैवविविधता व्यवस्थापन समितीवर नगरसेवकांमधून नियुक्त करण्याच्या सात सदस्यांचा विषय चर्चेला आला होता. त्यात भाजपाचे चार, राष्ट्रवादीचे दोन व शिवसेना किंवा काँग्रेस यांच्यापैकी एक अशी रचना करण्यात आली. भाजपाच्या चार व राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांची निवड बिनविरोध झाली, काँग्रेस व शिवसेना यांच्यातून निवड करताना मात्र पेच निर्माण झाला. त्यामुळे यावर मतदान घेण्यात आले.
शिवसेनेचे अविनाश साळवे यांना भाजपाच्या सदस्यांनी मतदान केले, तर काँग्रेसच्या लता राजगूरू यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मतदान केले. भाजपाच्या मदतीमुळे साळवे विजयी झाले.
याच वेळी काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी शिवसेनेला उद्देशून, घ्यायचे तर उपमहापौरपद तरी घ्यायचे, असे म्हटले. भाजपाचे हरिदास चरवड, प्रसन्न जगताप, सरस्वती शेंडगे, किरण दगडे-पाटील, राष्ट्रवादीचे दिलीप बºहाटे, दीपाली धुमाळ व शिवसेनेचे साळवे हे आता जैवविविधता समितीचे सदस्य म्हणून काम करतील. दरम्यान भाजपाला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर शिवसेनेने त्यांच्याशी एकदाही जमवून घेतले नव्हते. या दोन विषयांच्या निमित्ताने मात्र त्यांना भाजपाची मदत घ्यावी लागली व भाजपानेही ती लगेचच दिली.