'अरे आवाज कुणाचाsss.....' 'बीएमसीसी'ने पटकावला पुरुषोत्तम करंडक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 11:39 PM2022-01-23T23:39:02+5:302022-01-23T23:39:48+5:30
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी आणि रविवारी पार पडली.
पुणे : 'अरे आवाज कुणाचा'च्या जयघोषात बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने (बीएमसीसी) 'मंजम्मा पुराणम' एकांकिकेसाठी रविवारी पुरुषोत्तम करंडक पटकावला. नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या संघाने 'सहल' एकांकिकेसाठी द्वितीय क्रमांकाचा हरी विनायक करंडक मिळविला, तर तृतीय क्रमांकाचा संजीव करंडक गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या 'भाग धन्नो भाग' या एकांकिकेला मिळाला. श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाची 'एव्हरी नाईट इन माय ड्रीम्स' ही एकांकिका जयराम हर्डीकर सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका ठरली.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी ( दि. 22 आणि रविवारी ( दि. 23 ) पार पडली. प्रत्येक संघाने मोठ्या मेहनतीने अंतिम फेरीत एकांकिकांचे सादरीकरण केले. भरत नाट्य मंदिरात रविवारी रात्री निकाल जाहीर होणार असल्याने सर्व संघांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. बीएमसीसीने करंडक मिळविल्याचे जाहीर होताच विद्यार्थ्यांनी आवाज कोणाचा म्हणत जल्लोष केला.
नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या गौरी डांगे हिला सर्वोत्कृष्ट अभिनय नैपुण्य, कावेरी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या स्वराली पेंडसे हिला सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय नैपुण्य, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संकेत बडे याला अभिनय नैपुण्य, मॉडर्न महाविद्यालयाच्या (गणेशखिंड) तनया जाधव हिला अभिनय नैपुण्य ही पारितोषिके मिळाली. पेमराज सारडा महाविद्यालयाचा आविष्कार ठाकूर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रणव काळे आणि वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अपूर्व बाजारे आणि संकेत बढे यांना दिग्दर्शनासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
प्रणव सपकाळे ( शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय), हेमंत पाटील आणि गणेश सोडमिसे (श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय), मानस घोरपडे (कावेरी कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय), श्रुता भाटे आणि निरंजन केसकर (पेमराज सारडा महाविद्यालय,नगर) , ऐश्वर्या तुपे आणि आशुतोष भागवत ( आयएमसीसी) , योगेश सप्रे आणि शंतनू जोशी(बीएमसीसी) यांना अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाले.
आयएमएमसीसी, कावेरी महाविद्यालय, वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बीएमसीसी, श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय, पेमराज सारडा महाविद्यालय, मॉर्डन महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय हे नऊ संघ अंतिम फेरीत होते. चिन्मयी सुमीत, नितीन धंदुके आणि शैलेश देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.