भीमा पाटस चालवण्यामध्ये आलेले अपयश स्वीकारून संचालक मंडळाने राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:55+5:302021-04-01T04:10:55+5:30
केडगाव: भीमा पाटस कारखानाच्या रूपाने सहकार मोडीत काढण्याचा डाव आमदार राहुल कुल यांचा असून, या कारखान्याची वाटचाल खासगीकरणाकडे चालत ...
केडगाव: भीमा पाटस कारखानाच्या रूपाने सहकार मोडीत काढण्याचा डाव आमदार राहुल कुल यांचा असून, या कारखान्याची वाटचाल खासगीकरणाकडे चालत आहे. कारखाना चालवण्यास आलेले अपयश मान्य करून संचालक मंडळाने नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केली आहे.
केडगाव तालुका दौंड येथे खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात ते बोलत होते. या वेळी रमेश थोरात म्हणाले की, नुकतीच कारखान्याची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन झाली. या सभेमध्ये अवघ्या १५६ सभासदांनी सहभाग घेतला त्यापैकी १५, तर कारखान्याचे कामगार होते. या सभेमध्ये मला कारखान्याचे ताळेबंदा संदर्भात प्रश्न विचारायचे होते. म्हणून मी तब्बल दहा वेळा हात वर केला. परंतु संबंधित संचालक मंडळाकडून मला कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. एक प्रकारे लोकशाहीची ही मुस्कटदाबी कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल व संबंधित संचालक मंडळाने केली आहे. जे ४ सभासद बोलले ते सर्व आमदार राहुल कुल समर्थक होते. अवघ्या ३९ मिनिटांमध्ये सभा संपली.१५६ सभासदांनी ५१ हजार सभासद असणाऱ्या कारखाना चालवायचा कसा? या संदर्भातला निर्णय अवघ्या काही मिनिटांमध्ये आमदार राहुल कुल यांच्याकडे सोपवला.
देवेंद्र फडणवीस यांनी ३६ कोटी देऊनही पुढील २ हंगामामध्ये कारखाना बंद राहिला. कारखान्याच्या साखर पोत्यांना लागलेली आग संशयास्पद आहे. यासंदर्भात चौकशी चालू आहे. कारखान्याचा गळीत हंगाम बंद असतानाही ॲडव्हान्स पोटी सभासदांना वाटलेले दोन कोटी ७८ लाख रुपये मनामध्ये शंका उत्पन्न करणारे आहेत.एका ट्रॅक्टरवर संचालक मंडळाने ५ बँकांची कर्ज संबंधित बँकांची फसवणूक संचालक मंडळाने केली आहे. कारखाना संस्थेला चालू वर्षी क वर्ग मिळाला आहे आहे. एकूणच कुल यांच्या मनमानीमुळे भीमा पाटस कारखाना रसातळाला गेल्याचा आरोप थोरात यांनी केला.
या वेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय शेलार, उपाध्यक्ष अशोक गव्हाणे, लक्ष्मण दिवेकर ,भानुदास नेवसे, नाना जेधे, सूर्यकांत खैरे, नानासाहेब फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक लढवणार नाही
भीमा पाटसचे निवडणूक भविष्यात होणार आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता कारखाना रसातळाला गेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये संचालक मंडळाची निवडणूक मी लढवणार नाही असे रमेश थोरात यांनी यावेळी जाहीर केले.
३१ केडगाव थोरात
केडगाव तालुका दौंड येथे खरेदी-विक्री संघामध्ये बोलताना रमेश थोरात व मान्यवर.