शिक्षण मंडळ १४ मार्चला संपुष्टात
By admin | Published: April 22, 2017 03:42 AM2017-04-22T03:42:46+5:302017-04-22T03:42:46+5:30
महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या मुदतीवरून झालेला वाद अखेर संपुष्टात आला आहे, महापालिकेच्या शिक्षण मंडळाची मुदत १४ मार्च २०१७ रोजीच संपुष्टात आल्याचे स्पष्टीकरण
पुणे : महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या मुदतीवरून झालेला वाद अखेर संपुष्टात आला आहे, महापालिकेच्या शिक्षण मंडळाची मुदत १४ मार्च २०१७ रोजीच संपुष्टात आल्याचे स्पष्टीकरण महापालिकेचे प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप यांनी आज मुख्यसभेत दिले. मुदत समाप्तीनंतर शिक्षण मंडळाकडून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जगताप यांनी यावेळी सांगितले.
महापालिकेच्या मुख्यसभेत काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाची सद्यस्थिती काय आहे याची विचारणा प्रशासनाकडे केली. तसेच शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमांसाठी अंदाजपत्रकामध्ये १ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद असताना शिक्षण मंडळाकडून १ कोटी ४७ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली होती. यासाठी आयुक्तांची परवानगी घेतली होती का याची विचारणा त्यांनी केली.
राजेंद्र जगताप यांनी सांगितले, ‘‘उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाची मुदत संपेपर्यंत ते अस्तित्त्वात राहिल असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर शिक्षण मंडळाचा कारभार पालिकेकडे घेण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाची मुदत १४ मार्च २०१७ ला संपुष्टात आली आहे. त्यामुळे शिक्षण मंडळ बरखास्त होणार आहे.’’
शिक्षण मंडळाकडून मागील दिवसांत करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आणि निर्णयांचा अहवाल मागविण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने कार्यक्रमांचे अतिरिक्त बिल देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाची परवानगी घेतली
नव्हती. त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
- महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे शिक्षण मंडळाच्या मुदतीबाबत विचारणा करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी जुलै महिन्यात शिक्षण मंडळाची मुदत संपेल असे स्पष्टीकरण दिले होते. यापार्श्वभुमीवर विधी विभागाचा सल्ला घेतल्यानंतर शिक्षण मंडळाची मुदत १४ मार्चला संपल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.