Pune Ganpati: सलग तिसऱ्या वर्षी विनामहापौर मंडळांना मानपान; श्रीफळ देण्याचा मान अधिकाऱ्यांना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 01:24 PM2024-09-19T13:24:55+5:302024-09-19T13:25:37+5:30
महापालिकेची निवडणूक न झाल्याने मानाचे श्रीफळ देण्यासाठी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक नाहीत
पुणे: पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाच्या विर्सजन मिरवणुकीला अनंत चतुर्दशीला सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्याला पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली. यानंतर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अपर्ण करण्यात आला. मानाचा पहिला कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळा येथे आल्यानंतर ‘श्रीं’ची आरती करण्यात आली. पुणे महापालिकेकवर प्रशासक असल्याने सलग तिसऱ्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे स्वागत आणि मानाचे श्रीफळ देण्याचा मान अधिकाऱ्यांना मिळाला.
विसर्जन मिरवणुकीला सुरुवात हाेताना केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अनंत गाडगीळ, माजी महापौर अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आदी उपस्थित होते.
पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली आहे. पण, पालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर २०२२ आणि २०२३च्या गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते झाली होती. अद्याप पुणे महापालिकेची निवडणूक झालेली नाही. त्यामुळे नगरसेवक आणि उपमहापौर, महापौर नाहीत. त्यामुळे यंदा आयुक्त डॉ. राजेद्र भोसले यांच्या हस्ते विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पालिकेच्या टिळक चौकातील मंडपात यंदाही प्रशासकराज होते.
स्वागत कक्षात अधिकारी ठाण मांडून
पालिकेच्या टिळक चौकातील स्वागत कक्षात गणपती मंडळाच्या अध्यक्षांना अधिकाऱ्यांच्या हस्ते मानाचे श्रीफळ देण्यात आले. स्वागत कक्षामध्ये आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., अतिक्रमण विभागाचे प्रमुख साेमनाथ बनकर, घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, उपायुक्त चेतना केरूरे, मुख्य सुरक्षा अधिकारी डॅा. रमेश शेलार, विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंता मनीषा शेकटकर, पालिकेच्या बांधकाम विभागाचे राजेश बनकर, श्रीकांत वायंदडे, प्रभारी नगरसचिव योगिता भाेसले आदी उपस्थित होते.