खड्ड्यांच्या जबाबदारीवर सर्वांच्याच तोंडावर बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:14 AM2018-07-23T02:14:01+5:302018-07-23T02:14:25+5:30

दोनचार पावसातच रस्त्यांची चाळण

Boat on the face of everyone on the digestive responsibility | खड्ड्यांच्या जबाबदारीवर सर्वांच्याच तोंडावर बोट

खड्ड्यांच्या जबाबदारीवर सर्वांच्याच तोंडावर बोट

Next

- राजू इनामदार

पुणे : नेमेची येतो पावसाळा या चालीवर नेहमीच पडतात खड्डे असे समजून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा होते. मात्र दोनचार पावसातच रस्त्यांची चाळण होतेच कशी, यावर कोणीच बोलायला तयार होत नाही. महापालिका अधिकारी, राजकीय कार्यकर्त्यांच्या ठेकेदार कंपन्या, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतामुळे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून त्यामुळेच रस्त्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याची उघड चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
डांबरी रस्त्यांवर तर खड्डे पडतातच, पण आता सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडू लागले आहेत. डांबरी रस्त्यावरचे खड्डे पॅच लावून बुजवता येतात; काँक्रिटच्या रस्त्यांवर तर तेही करता येत नाही. महापालिकेने ठेकेदारांच्या माध्यमातून तयार केलेल्या रस्त्यांचा दर्जा तपासण्यासाठी तटस्थ अशी स्वतंत्र यंत्रणा आहे. रस्ता चांगला झाला आहे, असे त्यांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय ठेकेदार कंपनीचे बिल अदा केले जात नाही. तरीही शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर गेल्या दोनचार पावसातच खड्ड्यांनी हातपाय पसरले आहेत. त्यावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी जोरदार चर्चा झाली. मात्र कोणीही या खड्ड्यांना जबाबदार कोण, यावर
ब्र काढला नाही.
शहरात साधारण १ हजार ८०० किलोमीटर अंतराचे लहानमोठे रस्ते आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी म्हणून अंदाजपत्रकात दरवर्षी ५०० कोटी रुपये ठेवले जातात व ते दरवर्षी खर्चही केले जातात. गल्लीबोळातील लहान रस्ता तयार करण्यासाठी १० लाख रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत तर मोठा रस्ता १ कोटी रुपयांपासून ५ कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. सिमेंट काँक्रिटच्या लहान अंतराच्या रस्त्यासाठी ५ कोटी रुपयांपासून २० कोटी रुपयांपर्यंतचा खर्च येतो. याशिवाय पावसाळ्यात पडणारे हे खड्डे बुजवण्यासाठी म्हणून महापालिका दरवर्षी २५ ते ४० कोटी रुपयांचा खर्च करत असते तो वेगळाच.
रस्ते कसे तयार करावेत, याचे अभियांत्रिकी गणित आहे. त्यानुसारच तो किती इंच खोदायचा, खडी किती इंच टाकायची, खडी किती आकाराची असावीत, किती थर असावेत, डांबरी थर किती असावा, त्यावर बारीक खडी किती टाकावी, त्यानंतर खडीची पावडर किती असावी, या सर्व गोष्टींची मापे आहेत. निविदेत या सर्व गोष्टी नमूद केलेल्या असतात. त्यावरूनच रस्त्याच्या कामाचा खर्च निश्चित केला जातो. त्यापेक्षा ५ किंवा थेट २५ टक्के जादा दराच्या निविदा ठेकेदारांकडून दाखल केल्या जातात. त्यातील कमी दराच्या कंपनीला काम दिले जाते. या कामावर महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याने (ज्याची नियुक्ती त्या भागात केलेली असते) लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. ठेकेदाराने निविदेत नमूद केले आहे त्याप्रमाणेच काम करणे अपेक्षित आहे. या तटस्थ यंत्रणेला महापालिकेने कामाचा दर्जा तपासण्याचे अधिकार दिले आहेत, त्या यंत्रणेने महापालिकेने नमूद केलेले सर्व निकष लावूनच तपासणी करणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कामाची मुदत असते, तो किती टिकणे अपेक्षित आहे, त्याचीही मुदत असते, तोपर्यंत ठेकेदाराची अनामत रक्कम महापालिकेकडे जमा असते, रस्ता मुदतीच्या आत खराब झाला तर ती परत केली जात नाही. इतके सगळे नियम असतानाही रस्त्यांच्या कामात निकृष्ट दर्जाचा माल वापरला जात असल्यामुळेच ते पावसाळ्यात तग धरत नाही, असे या क्षेत्रातील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

...यामुळे होतात रस्ते खराब
आधीच कमकुवत असलेले रस्ते केबल कंपन्यांच्या खोदाईमुळे आणखीनच कमजोर होतात व काही दिवसांमध्येच मान टाकतात. त्यानंतर त्यांच्या पूर्ण कामाची निविदा काढली जाते.
खड्डा लहान असतानाच तो बुजवला तर वाढत नाही. मात्र खड्डे बुजवण्याचे काम घेतलेली ठेकेदार कंपनी त्यांच्या सोयीनुसार काम करते. त्यात अनेक खड्डे मोठे होत जातात व संपूर्ण रस्ताच खराब होतो.
मांडवांमुळे केलेल्या खड्ड्यांवर प्रशासनाकडून गेली काही वर्षे दोष देण्यात येतो. मात्र हे खड्डे त्वरित बुजवले गेले तर रस्ता खराब होण्याचा प्रश्न निर्माणच होणार नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
डांबर व पाणी यांचे वाकडे आहे, मात्र ते माहिती असतानाही पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी म्हणून अनेक रस्त्यांवर काहीही व्यवस्था केली जात नाही.

काय करता येईल?
ठेकेदार कंपनी वापरत असलेल्या मालावर लक्ष ठेवणे.
रस्त्याचे काम शास्त्रीय पद्धतीने होईल हे पाहणे.
रस्त्यावर लहान खड्डा पडला तरी तो बुजवून घेणे.
पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहणार नाही, याची काळजी घेणे.
निविदेत नमूद केल्याप्रमाणेच काम करून घेणे.
दर्जाचे निकष पाळले जातात, की नाही हे पाहणे.
निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे.
केबल कंपन्यांचे खोदाईचे काम रस्ता खराब करणार नाहीत, याकडे लक्ष ठेवणे.

Web Title: Boat on the face of everyone on the digestive responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.