तळेगाव ढमढेरे येथे शवविच्छेदनाविना मृतदेह चार तास रुग्णवाहिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:23+5:302021-06-02T04:10:23+5:30

तळेगाव ढमढेरे येथील श्यामल लक्ष्मण बागुल (वय २४) या युवतीने मंगळवार (दि. १ जून) रोजी दुपारी बारा ...

Bodies in an ambulance for four hours without autopsy at Talegaon Dhamdhere | तळेगाव ढमढेरे येथे शवविच्छेदनाविना मृतदेह चार तास रुग्णवाहिकेत

तळेगाव ढमढेरे येथे शवविच्छेदनाविना मृतदेह चार तास रुग्णवाहिकेत

Next

तळेगाव ढमढेरे येथील श्यामल लक्ष्मण बागुल (वय २४) या युवतीने मंगळवार (दि. १ जून) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस ठाण्यात याबाबतीत नामदेव विष्णू बागुल (वय ५५, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी खबर देताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस नाईक अमोल चव्हाण,भरत कोळी यांनी तातडीने घटनास्थळी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेला. मात्र, सदर ठिकाणी आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याचे कारण सांगत मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मृत मुलीच्या नातेवाईक व पोलिसांनी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात चौकशी केली असता सदर ठिकाणी कोविड सेंटर असल्यामुळे शवविच्छेदनसाठी अधिकारी नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चार वाजेपर्यंत मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आला होता. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तळेगाव अथवा शिक्रापूर या ठिकाणी शवविच्छेदन करण्याची विनंती केली असता शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांनी केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका तायवडे यांना शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, सदर घटनेमध्ये डॉक्टर अभावी मृतदेहाची झालेली हेळसांड व मनस्ताप यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते विजय घुले यांनी सांगितले की, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण १६ गावे असून, सुमारे दीड लाख लोकसंख्या आहे. सध्या येथील वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्यामुळे शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेल्या मृताच्या नातेवाईकास व ग्रामस्थांना सुमारे चार तास रखडत बसावे लागले, शेवटी ससून रुग्णालयाचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी यांच्या पुढाकारामुळे शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. येथे दोन वैद्यकीय डॉक्टरांची नियुक्ती असतानाही फक्त एकच वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतो गेल्या अनेक दिवसांपासून नियुक्त असलेला वैद्यकीय अधिकारी येथे ड्यूटीवर येत नसल्याचे दिसून येते याची सखोल चौकशी करावी.

आमच्या भगिनीचा मृतदेह शवविच्छेदनसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्यानंतर, ‘येथे डॉक्टर नाहीत तुम्ही ससून येथे जाऊन शवविच्छेदन करावे’ त्याबाबत कोविडसाठी नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टर स्मृती यादव यांनी रेफर केले. आमच्याकडे मनुष्यबळ असल्याने आम्ही पुण्यालाही जाऊ शकलो असतो. मात्र सर्वसामान्य नागरिकांचे काय? या घटनेमुळेे मात्र मनस्ताप सहन करावा लागला.

-अंकित बागुल, नातेवाईक

मला जिल्हा परिषदेने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव ढमढेरे येथे कोविड ड्यूटीसाठी नेमलेले आहे.सध्या येथील वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने नातेवाइकांना ससून येथे शवविच्छेदनसाठी मृतदेह घेऊन जाण्याबाबत सांगण्यात आले.

- डॉ. स्मृती यादव,वैद्यकीय अधिकारी

तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात शवविच्छेदनाअभावी रुग्णवाहिकेत पडून असलेला मृतदेह व ताटकळत थांबलेले नातेवाईक व ग्रामस्थ.

Web Title: Bodies in an ambulance for four hours without autopsy at Talegaon Dhamdhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.