चौैथ्या दिवशीही मृतदेह सापडला नाही
By admin | Published: September 15, 2016 01:43 AM2016-09-15T01:43:59+5:302016-09-15T01:43:59+5:30
चासकमान धरणात पोहताना बुडालेल्या दीपक गादेकरचा मृतदेह आज चौथ्या दिवशीही सापडला नाही. स्थानिक पातळीवर ग्रामस्थांकडून ३ दिवस शोधकार्य चालू आहे
डेहणे : चासकमान धरणात पोहताना बुडालेल्या दीपक गादेकरचा मृतदेह आज चौथ्या दिवशीही सापडला नाही.
स्थानिक पातळीवर ग्रामस्थांकडून ३ दिवस शोधकार्य चालू आहे. सर्कल व तलाठी सोडून इतर एकही अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. दोन पोलिसांच्या भरवशावर हे सर्व शोधकार्य चालू आहे. नातेवाइकांचा आक्रोश सर्वसामान्य नागरिकांच्याप्रति असणाऱ्या निष्ठूर वृत्तीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कानावर चौथ्या दिवशीही पोहोचला नाही.
मृत दीपकची पत्नी बेशुद्ध अवस्थेत आहे. आई व पत्नी अतिदक्षता विभागात आहेत. दीपकला दीड वर्षाची मुलगी आहे. वडील धोंडू गादेकर धरणाच्या काठावर बसून मृतदेह शोधून द्या, म्हणून विनवण्या करीत आहेत. मृताच्या कुटुंबाची अवस्था पाहून ग्रामस्थांकडून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
दरम्यान, घटना घडून चार दिवस झाले, तरी प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापन टीम व पाणबुडी उपलब्ध करता आलेली नाही. आपत्ती व्यवस्थापन टीम उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तरीसुद्धा वरिष्ठ पातळीवर एकही अधिकारी फोन लावण्याशिवाय काही करू शकला नाही. यामुळे नातेवाइकांचा संयम संपला आहे. गुरुवारी सकाळी मृतदेह ताब्यात न दिल्यास नातेवाइकांनी तहसीलदार कचेरीत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. (वार्ताहर)