हैदराबाद पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या आरोपीचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:16 AM2021-08-24T04:16:10+5:302021-08-24T04:16:10+5:30
पुणे : नगर रस्त्यावरील चंदननगर भागातून हैदराबाद पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या आरोपीचा मृतदेह सोमवारी दुपारी खराडी भागात सापडला. जुबेर ...
पुणे : नगर रस्त्यावरील चंदननगर भागातून हैदराबाद पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेल्या आरोपीचा मृतदेह सोमवारी दुपारी खराडी भागात सापडला.
जुबेर हाफिज शेख (वय २०, रा. मरकुंडा, जि. बिदर, कर्नाटक) असे या आरोपीचे नाव आहे.
खराडी भागातील आयटी पार्कजवळ असलेल्या एका बंधाऱ्याच्या पाण्यात एक युवक मृतावस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चंदननगर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. चौकशीत हा मृतदेह शेख याचा असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याबाबतची माहिती हैदराबाद पोलिसांना दिली आहे. शेखने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शेख याच्या विरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी हैदराबाद परिसरातील सरूरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो चंदननगर भागात नातेवाईकांकडे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर २० ऑगस्टला हैदराबादमधील पोलीस उपनिरीक्षक बी. कृष्णय्या रामलू आणि पथकाने त्याला चंदननगर भागातून ताब्यात घेतले. शेख आणि अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांना मोटारीतून घेऊन हैदराबादला घेऊन पोलिसांचे पथक निघाले होते. वाटेत एका हॉटेलजवळ पोलिसांनी मोटर थांबविली. त्या वेळी तो पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. या बाबतची माहिती चंदननगर पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्याचा शोध घेतला जात होता.