बेपत्ता परप्रांतीय तरुणाचा मृतदेह अखेर सापडला
By admin | Published: January 15, 2017 05:28 AM2017-01-15T05:28:29+5:302017-01-15T05:28:29+5:30
चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अठरावर्षीय परप्रांतीय तरुणाचा मृतदेह आज (दि. १४) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कालठण नं. २ गावच्या हद्दीत उजनी पाणलोट क्षेत्रातील पाण्यात आढळला.
इंदापूर : चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या अठरावर्षीय परप्रांतीय तरुणाचा मृतदेह आज (दि. १४) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कालठण नं. २ गावच्या हद्दीत उजनी पाणलोट क्षेत्रातील पाण्यात आढळला.
हेदादूल अमीन शेख (वय १८, मूळ रा. अमानत दिआडा, ता. राधानगर, जि. साहेबगंज, झारखंड, सध्या रा. शिरसोडी, ता. इंदापूर) असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. यासंदर्भात त्याचा चुलतभाऊ मिराजुन तालिब शेख याने दि. ११ जानेवारीस तो बेपत्ता झाल्याची खबर इंदापूर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी सांगितले, की खबर देणारे व त्याचे कुटुंबीय मजुरी करून उपजीविका करतात. मिराजुन शेख याचा चुलतभाऊ रफीक अमीन शेख, हेदादूल अमीन शेख मासेमारीचा व्यवसाय करण्यासाठी उजनी पाणलोटक्षेत्रातील शिरसोडी गावात येऊन राहिले होते. १० जानेवारीस १० वाजता हेदादूल बेपत्ता झाला. शोधाशोध करून दुसऱ्या दिवशी तो बेपत्ता झाल्याची खबर मिराजुन याने इंदापूर पोलिसांना दिली. आज सकाळी हेदादूलचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
या प्रकरणाविषयी शहर परिसरात वेगळीच चर्चा होत होती. मृत तसेच त्याचे भाऊ वाळूउपसा करणाऱ्या बोटीवर काम करीत होते. १० जानेवारीला इंदापूर महसूल विभागाच्या पथकाने छापा टाकला. कामगारांची बेदम धुलाई केली. त्या वेळी झालेल्या मारहाणीत हेदादूलचा मृत्यू झाला व बोटीला जलसमाधी देताना वाळूच्या ढिगाऱ्याखाली ते गाडला गेला, अशी चर्चा होती. गाडलेल्या बोटी वर काढल्या तरी वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे ग्रामस्थांनी सांगितले. दबावामुळे वस्तुस्थिती समोर येत नसल्याची चर्चा होती.