खळबळजनक बातमी! पुणे महापालिकेच्या पाण्याच्या टँकरमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:07 AM2024-06-21T11:07:07+5:302024-06-21T11:07:48+5:30
गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला....
हडपसर : महापालिकेचा पाण्याच्या टँकरमध्ये एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने हडपसर-फुरसुंगी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला.
नेमका खून आहे की आत्महत्या? याबाबत मात्र पोलिसांकडून तपास केला जात आहे. तो मृतदेह काढून येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष हरपळे यांच्या रुग्णवाहिकेने ‘ससून’मध्ये पाठवण्यात आला आहे. ती आत्महत्या आहे की, त्या महिलेला मारून टँकरमध्ये टाकले आहे की काय, याबाबत हडपसर पोलिस तपास करीत आहेत.
कौशल्या मुकेश चव्हाण (वय २५, रा. दुगड चाळ, जेएसपीएम कॉलेजजवळ, हांडेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात ही महिला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय २७, रा. दुगड चाळ, हांडेवाडी) यांचा पाण्याचा टँकरचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी घराजवळ टँकर उभा केला. त्यानंतर ते घरी गेले.
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी टँकर बाहेर काढला. त्यानंतर त्यांनी रामटेकडी येथे पाणी भरल्यानंतर ते टँकर घेऊन फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका घरी पाणी पोचविण्याकरिता गेले. तेथे टाकीत पाणी सोडत असताना पाणीच बाहेर येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सुरुवातील व्हॉल्व्ह तपासला. तरी देखील पाणी येत नसल्याने त्यांनी पाइप काढून पाहिला असता आतून साडी आल्याचे त्यांना दिसले. साडी कुठून आली, हे पाहण्यासाठी ते टँकरवर चढले. टँकरचे झाकण उघडून पाहिले असता, आतमध्ये कौशल्या यांचा मृतदेह पाण्यामध्ये आढळून आला. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती कळवली. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढला. तसेच पंचनामा करीत हा मृतदेह ससून रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवून दिला आहे.