Crime News: हिंजवडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला नागपुरातील तलावात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 10:55 IST2023-10-26T10:51:11+5:302023-10-26T10:55:02+5:30
सुरजकुमार हा हिंजवडीमधील आयटी कंपनीत काम करत होता...

Crime News: हिंजवडीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला नागपुरातील तलावात
पिंपरी :हिंजवडी येथून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह नागपूरमधील अंबाझरी तलावाच्या पाण्यात शनिवारी (दि.२१) मिळून आला. ही आत्महत्या आहे की काही घातपात याचा तपास पोलिस करत आहेत. सुरजकुमार विलास बांबल (वय ३२, रा.शिवगणेश नगर, पुणे) असे मृताचे नाव आहे. सुरजकुमार बेपत्ता असल्याविषयी हिंजवडीपोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.१९) विलास रंगरावजी बांबल (६३, रा. शिवगणेश नगर धावडे वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरजकुमार हा हिंजवडीमधील आयटी कंपनीत काम करत होता. तो गुरुवारी (दि.१९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी निघाला होता. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. घरच्यांनी त्याचा शोध घेत हिंजवडी पोलिस ठाण्यात तो हरवला असल्याबाबतची फिर्याद दिली. पोलिस त्याचा शोध घेत असतानाच शनिवारी (दि.२१) सकाळी सातच्या सुमारास नागपूर पोलिसांना सुरजकुमार याचा मृतदेह अंबाझरी तलावात सापडला. सुरजकुमारच्या खिशातील कागदपत्रावरून त्याचे नाव पोलिसांना समजले. सुरजकुमार हा पुण्याहून नागपूरला कसा आला? त्याने आत्महत्या केली की घातपात झाला याविषयी पोलिस अधिक तपास करत आहेत.