शहीद मेजर शशीधरन नायर यांचे पार्थिव पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 06:41 AM2019-01-13T06:41:11+5:302019-01-13T08:07:09+5:30
आज होणार अंत्यसंस्कार : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या स्फोटात वीरमरण
पुणे : सीमेवर भारतभूमीची सुरक्षा करताना वीरमरण आलेले मेजर शशीधरन नायर (३२) यांचे पार्थिव शनिवारी सायंकाळी घोरपडीतील राष्ट्रीय युध्द स्मारकावर आणण्यात आले. तेव्हा ‘शहीद मेजर नायर अमर रहे’ अशा घोषणांसह सलामी देण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात नायर शहीद झाले.
#Pune: Mortal remains of Major Shahi Dharan V Nair brought to his home in Khadakwasla. He lost his life in IED blast in Nowshera on 11th January. pic.twitter.com/EflBlrUKb5
— ANI (@ANI) January 13, 2019
मूळचे केरळचे असणाऱ्या मेजर शशीधरन यांचे कुटुंब सध्या खडकवासला परिसरात कृष्णा हाईट्स इमारतीत वास्तव्यास आहेत. शशीधरन यांनी केंद्रीय विद्यालयात शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असताना त्यांनी एनसीसीमध्ये सहभाग घेऊन ‘उत्कृष्ट स्नातक’ किताब पटकावला होता. सध्या ते गोरखा राफलमध्ये कार्यरत होते. २००७ मध्ये डेहराडून येथील रक्षा अकादमीमधून प्रशिक्षण पूर्ण करून ते लष्करात दाखल झाले होते. त्यांच्या ११ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेत नेत्रदीपक कामगिरी केली.
संध्याकाळी त्यांचे पार्थिव पुण्यातील दक्षिण मुख्यालयातील वॉर मेमोरियल येथे आणण्यात आले. तिथे त्यांचे कुटुंबीय तसेच लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. नायर यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांच्यामागे आई, पत्नी आणि बहीण असा परिवार आहे. त्यांची बहीण अविवाहित असून वृद्ध आई व पत्नीची जबाबदारी पेलण्यास आता घरात कोणीही नाही. शुक्रवारी दुपारी त्यांचा आलेला फोन शेवटचाच ठरला.
लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार
नायर यांचे पार्थिव रात्री सदन कमांड येथील रुग्णालयात रात्रभर ठेवण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी सात वाजता त्यांच्या खडकवासला भागातील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशान भूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.