कोरेगाव भीमा येथील बेपत्ता तरुणीचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 02:02 AM2018-04-23T02:02:49+5:302018-04-23T02:02:49+5:30
पूजा सुरेश सकट ही शनिवारी दुपारपासून बेपत्ता होती. रविवारी दुपारी साडेबारा वाजता तिचा मृतदेह घराजवळच्या एका विहिरीत आढळला.
पुणे : कोरेगाव भीमा येथील १९ वर्षीय मुलीचा मृतदेह रविवारी विहिरीत आढळल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. १ जानेवारीला येथे दंगल झाली होती. दंगलीच्या वेळी घर पेटवण्याच्या प्रकाराचा संदर्भ या घटनेशी लावण्यात येत आहे.
माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आला, असा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे. माझे घर ज्यांनी पेटवून दिले त्यांचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पूजा सुरेश सकट ही शनिवारी दुपारपासून बेपत्ता होती. रविवारी दुपारी साडेबारा वाजता तिचा मृतदेह घराजवळच्या एका विहिरीत आढळला. सुरेश सकट यांनी सांगितले की, माझे कुटुंब १५ वर्षांपासून भीमा कोरेगावमधील पीडब्ल्यूडीच्या जागेत राहत आहे. माझ्या घराशेजारचा प्लॉट एकाला विकत घ्यायचा आहे. मात्र माझ्या पत्र्याच्या शेडमुळे त्या जागेची किंमत कमी होत असल्याने घर खाली करण्याबाबत काही दिवसांपासून मला धमकी देण्यात येत आहे. त्याबाबत मी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी कोल्हापूर पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार देखील केली होती.
१ जानेवारीला येथे दंगल झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझे घर जाळण्यात आले. त्यामागे घर खाली करण्याची धमकी देणाºयांचा हात होता. मी आतापर्यंत चार वेळा तक्रार दिली आहे. नुकताच पुरवणी जबाब देखील दिला होता. त्यातूनच त्यांनी माझ्या मुलीचा खून केला, असे सकट यांनी सांगितले.
पूजा हिचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका तिच्या कुटुंबियांनी घेतली होती.
चार वेळा तक्रार करूनही सकट कुटुंबियांना आधार देण्यात आला नाही. या घटनेचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. कोरेगाव भीमा भागात जातीयवाद करणाºयांवर पोलिसांनी त्वरीत कडक कारवाई करावी. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या त्रासामुळे हा प्रकार घडला आहे.
- सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर, पुणे