खून करून मृतदेह जंगलात पुरला, नगर जिल्ह्यातील घारगावमध्ये केला निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:32 AM2018-02-05T00:32:58+5:302018-02-05T00:33:08+5:30
शरीर सुखासाठी वेश्या न पुरविल्याच्या या कारणावरुन मित्रांनी तरुणाच्या डोक्यात पाटा घालून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
चाकण : शरीर सुखासाठी वेश्या न पुरविल्याच्या या कारणावरुन मित्रांनी तरुणाच्या डोक्यात पाटा घालून त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चाकणच्या या तरुणाला अहमदनगर जिल्ह्यातील घारगावमध्ये नेऊन मारल्यानंतर त्याचा मृतदेह जंगलात पुरण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली.
बाळू जनार्दन नवले (वय ४५, रा. खालुंब्रे, ता. खेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. नवले हे मुळचे जुन्नर तालुक्यातील कुरण येथील रहिवासी होते. याप्रकरणी भीमराव मारुती पवार ( वय ३२, रा. खालूंब्रे, ता.खेड, मुळगाव धुमाळवाडी, पो. डोळसने, घारगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले यांचे लग्न झालेले असून खालुंब्रे येथे ते पत्नीसह राहण्यास होते. आरोपी आणि नवले एकमेकांचे मित्र होते.
नवले यांना २४ जानेवारी रोजी मोबाईलवर फोन आला. कुरण गावी जाऊन येतो असे पत्नीला सांगून नवले दुचाकी घेऊन घराबाहेर पडले. त्यानंतर तीन दिवस ते घरी परतलेच नाहीत. नातेवाईकांनी त्यांचा आसपासच्या गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा काहीच पत्ता लागू शकला नाही. त्यामुळे २७ जानेवारीला चाकण पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तातडीने नवले यांच्या मोबाईल कॉल्सचे डिटेल्स काढण्यास सुरुवआत केली. मोबाईल कॉल्सच्या तपशीलावरुन पवार याला संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. घारगावचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, चाकणचे उपनिरीक्षक श्रीधर जगताप, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, हवालदार अमोल जाधव यांनी आरोपीला घारगावच्या जंगलात नेले. जंगलामध्ये पुरलेला मृतदेह काढून पंचनामा केला. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी अशोक थोरात हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
>पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबुल
त्याच्याकडे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या पथकाने चौकशीला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन बनविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
नवले, पवार आणि त्यांचा एक साथीदार असे तिघे मिळून २५ जानेवारी रोजी धुमाळवाडी येथे पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी नवले यांच्याकडे वेश्येची मागणी केली होती. ही मागणी न पुरविल्याने त्यांच्यामध्ये भांडणे झाली.
या भांडणात पवार व त्याच्या साथीदाराने नवले यांना मारहाण करीत डोक्यात पाटा घालून खून केला. त्यानंतर दुसºया दिवशी नवले यांचा मृतदेह घारगावच्या जंगलात पुरला.