एका खोलीत दोन, तीन दिवस राहिलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 06:57 PM2021-05-11T18:57:06+5:302021-05-11T18:57:12+5:30
दारुच्या नशेत एका व्यक्तीने खोलीत स्वतःला बंद करून केली होती आत्महत्या
लोणी काळभोर: "जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे " कोरोना कालावधीत यात थोडा बदल करून "जगी ज्यास कोणी नाही, त्यास पोलीस आहे. असे एकमेव उदाहरण पोलिसांच्या कौतुकास्पद कामगिरीतून दिसून आले आहे.
असाच एक प्रकार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत घडला आहे.
भाड्याच्या खोलीत राहणारा व एक खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करणारा तरुण विवेक पेतराज पंडीत ( वय. ३६, रा.लोणी स्टेशन ) याने दोन दिवसांपूर्वी दारुच्या नशेत पेटवून घेऊन आत्महत्या केली. घरात तो एकटाच राहत असल्यामुळे ही घटना कुणालाच माहीत नव्हती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने खोलीच्या दरवाजाला आतून कडी लावून भरपूर मद्य प्राशन केले होते. नशेत पेटवून घेतल्यावर त्याला आगीचे चटके असह्य झाल्यावर त्याने खोलीतील पाण्याच्या बॅरलमध्ये उडी मारली. बॅरल मधील पाण्यामुळे आग विझली. परंतु दारुच्या नशेत असल्याने त्याला बाहेर यायचे समजले नाही. बॅरलमध्येच मरण पावला.
दोन - तीन दिवसानंतर त्याच्या खोलीतून दुर्गंधीयुक्त वास येऊ लागला. समाजसेवा करण्यात अग्रेसर असलेले राम शिग्री यांनी हि बाब तात्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या कानावर घातली. राजेंद्र मोकाशी आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद केला असल्याने दरवाजाची कडी तोडून पोलीस पथकाने आत प्रवेश केला. त्यावेळी विवेक पंडित भाजलेल्या अवस्थेत पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला.
बराच कालावधी झाल्यामुळे त्याचे शरीर खूपच फुगले होते. तेथे प्रचंड दुर्गंधी तेथे सुटली होती. शरीर फुगल्याने बॅरलच्या बाहेर मृतदेह काढता येत नव्हता. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा मृतदेह तेथून तातडीने हलवणे गरजेचे होते. त्यांनी पोलीस हॅक साॅ ब्लेडच्या सहाय्याने तो बॅरल कापला. पंचनामा करून मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवला. या वेळी तेथे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. अशाही परिस्थितीत पोलीसांनी आपले काम चोखपणे बजावले. या बद्दल लोणी काळभोर पोलीस व राम शिग्री यांचे कौतुक होत आहे.