मांजाने गळा कापला गेलेल्या महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 02:24 PM2018-02-11T14:24:27+5:302018-02-11T14:24:44+5:30
बंदी असलेल्या चिनी मांजामुळे गळा कापला गेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला. सुवर्णा मुजुमदार असे त्यांचे नाव आहे.
पुणे : बंदी असलेल्या चिनी मांजामुळे गळा कापला गेलेल्या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी सकाळी मृत्यू झाला. सुवर्णा मुजुमदार असे त्यांचे नाव आहे. पुणे महापालिका भवनाकडे जाणा-या शिवाजी पुलावरून बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान त्या दुचाकीवरून घरी जात होत्या. त्यावेळी चिनी मांजा गळ्याभोवती गुंडाळल्याने त्यांचा गळा कापला गेला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र, उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही शहरातील काही दुकानांमध्ये चिनी मांजा विकला जात आहे. या मांजामुळे अनेकांना किरकोळ व गंभीर अपघात होत आहेत. मुजुमदार यांच्या मृत्यूची शहर पोलीस दलाने गंभीर दखल घेतली असून मांजा विकणा-यांना कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सांगितले. मुजुमदार या एका दैनिकाच्या जाहिरात व मार्केटिंग विभागात काम करीत होत्या.