बोगस जामीनदार होणारी टोळी गुन्हे शाखेच्या ताब्यात, वकिलांवर गुन्हा दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 09:27 AM2019-10-16T09:27:02+5:302019-10-16T09:27:22+5:30
बनावट कागदपत्रांच्या आधारे काही वकील आरोपीला जामीन मिळवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
पुणे : न्यायालयात बनावट रेशनकार्ड, आधार कार्ड तयार करुन बोगस जामीनदार होणा-या टोळीला गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी न्यायालयात आवारात छापा घालून पकडले. गुन्हे शाखेने या टोळीतील १० जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बनावट रेशनकार्ड, आधार कार्ड जप्त केली आहेत.
बनावट कागदपत्रांच्या आधारे काही वकील आरोपीला जामीन मिळवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरुन मंगळवारी पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात छापा घालून १० संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड जप्त केली आहे.
या बोगस जामीनदारांकडे चौकशी केल्यावर काही जण त्यांना बनावट आधार कार्ड तयार करुन देत असल्याची माहिती मिळाली. आधार कार्डवर नाव एकाचे तर, फोटो दुस-याचा असा प्रकारही चौकशीत पुढे आला आहे. हे बनावट जामीनदार असल्याचे माहिती असतानाही आरोपीचे जामीनपत्र घेऊन काही वकील जामीन करुन देत असल्याची माहिती त्यातून पुढे आली आहे.
या टोळीतील १० जणांकडे काल रात्रभर चौकशी करण्यात येत होती. रात्री उशिरा याबाबत गुन्हे दाखल करण्यात येणार होता. याबाबत आज सकाळी गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यात काही वकिलांनाही आरोपी करण्यात येणार असल्याचे समजते.