बोगस डॉक्टरांचा फास आवळला
By admin | Published: February 9, 2015 04:08 AM2015-02-09T04:08:52+5:302015-02-09T04:08:52+5:30
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या ८ हजार अधिकृत डॉक्टरांचा डेटाबेस तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या ८ हजार अधिकृत डॉक्टरांचा डेटाबेस तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे नॅचरोपॅथी, इलेक्ट्रोहोमियोपॅथीच्या फसव्या पदव्या लावून रुग्णांची फसवणूक करणारे बोगस डॉक्टर आपोआप कचाट्यात सापडणार असून, त्यांच्याविरुद्धचा फास आवळला जाणार आहे.
राज्य शासनाने १९९१ मध्ये बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी महापालिकांमध्ये आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा अध्यादेश काढला होता. मात्र, २०१२ पर्यंत त्यावर काहीच अंमलबजावणी झाली नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सन २०११-१२ मध्ये शहरातील बोगस डॉक्टरांमुळे होणारे गंभीर परिणाम उजेडात आणले. तसेच या प्रकाराबद्दल मोहीम उघडली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
पुणे महापालिकेमध्ये २७ सप्टेंबर २०१३ रोजी बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची स्थापना होऊन कारवाई करण्यासाठी धावपळ सुरू झाली. त्या वेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे शहरातील अधिकृत डॉक्टरांची यादीच नसल्याचे उजेडात
आले. त्यानंतर क्षेत्रीय कार्यालयामार्फत सर्व डॉक्टरांना अर्जांचे वाटप करण्यात आले
आहे.
या अर्जासोबत आवश्यक त्या वैद्यकीय पदव्यांची प्रमाणपत्रे जोडून जमा करून घेतला जात आहे. शहरातील ८ हजार वैद्यकीय व्यावसायिकांना याचे वाटप करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी २०१५ ही अर्ज जमा करण्याची शेवटची मुदत आहे.
या कारवाईमुळे शहरामधील बोगस डॉक्टरांना पायबंद बसणार आहे. (प्रतिनिधी)