बोगस डॉक्टरांची दुकाने राजरोस सुरूच!
By admin | Published: September 29, 2016 05:58 AM2016-09-29T05:58:44+5:302016-09-29T05:58:44+5:30
कारेगाव भीमा येथील प्रणव विश्वास या बोगस डॉक्टरवर ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे गुन्हा दाखल झाला. मात्र, जिल्ह्यात २००३ पासून असे अनेक जण आपली दुकाने
- बापू बैलकर, पुणे
कारेगाव भीमा येथील प्रणव विश्वास या बोगस डॉक्टरवर ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे गुन्हा दाखल झाला. मात्र, जिल्ह्यात २००३ पासून असे अनेक जण आपली दुकाने सेटलमेंट करून सुरूच ठेवत असल्याचे वास्तव आहे. आरोग्य विभाग एफआरआय दाखल करते. पुढे काहीच कारवाई होताना दिसत नाही.
२०१६ मध्ये आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ३९ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. मात्र, त्यातील बहुतांश जणांवर २००४ पासून एफआरआय दाखल आहेत. त्यामुळे २०१६च्या यादीतही त्यांचा समावेश असल्याने त्यांची दुकाने सुरूच असल्याचे स्पष्ट होते.
कोरेगाव भीमा येथील प्रणव विश्वास या डॉक्टरविरुद्ध अखिल भारतीय ग्राहक मंचाच्या वतीने आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रणव विश्वास असे त्याचे नाव आहे. तक्रारीनंतर आरोग्य विभागाने त्याच्यावर एफआरआय दाखल केले. मात्र, त्याचे दुकान सुरूच होते. लोकमतने हा विषय लावून धरल्यानंतर पोलिसांनी अखेर त्याला अटक केली. न्यायालयात जामिनावर तो बोहेर आला. याबाबत अधिक माहिती घेतली असता, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांच्या तक्रारीनंतर आरोग्य विभागाने जुलै २०१६मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ३९ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. यांत खेड, दौैंड व शिरूर या तालुक्यांत सर्वांत जास्त बोगस डॉक्टरांची दुकाने सुरू असल्याचे समोर आले आहे. खेड तालुक्यात सर्वाधिक १३, दौैंड तालुक्यात १२, तर शिरूर तालुक्यात ७ जणांसा समावेश आहे. तसेच, इंदापूरला ३, जुन्नरला २, पुरंदर, बारामतीत १ जणांचा समावेश आहे. यातील खेडमधील १३, शिरूरमधील ७ डॉक्टरांवर फक्त एफआरआय दाखल आहे. विशेष म्हणजे, काही डॉक्टरांवर आरोग्य विभागाने २००४मध्ये एफआरआय दाखल केलेला आहे. तर, काहींवर २०१३, १५ व १६ या वर्षांत एफआरआय
दाखल आहे. मात्र, यांची २०१६च्या यादीतही नावे आहेत. म्हणजे, त्यांच्यावर पुढील कारवाई झालेली नाही. यावरून त्यांची दुकाने सुरूच असल्याचे स्पष्ट होते.
पुरंदर तालुक्यात मधुकर साखारे याच्यावर फाजैदारी गुन्हा दाखल असून, न्यायालयात केस सुरू आहे. बारामतीतील कृष्णा विश्वास याच्यावर १० सप्टेंबर २०११ रोजी त्याचे दुकान सील केले असून, पोलिसांना कारवाईसाठी पत्र दिलेले आहे. दौैंड तालुक्यातील १२ जणांवर कारवाईसाठी पोलीस ठाण्याला आरोग्य विभागाने पत्र दिलेले आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील नागेश कोरडे याच्यावर २७ सप्टेंबर २०१३ रोजी गुन्हा दाखल आहे. इंदापूर तालुक्यातील रामदास तात्यासाहेब मोरे व एम. एस. सरकार यांच्यावर कारवाईचा रकाना निरंक आहे. तर, कळाशी येथील मंडल याच्यावर गुन्हा दाखल आहे.
पोलिसांकडून चार्जशीट दाखलच होत नाही...
बोगस डॉक्टर आढळला, तर आरोग्य विभाग एफआरआय दाखल करून पोलिसांच्या ताब्यात देतात. त्यानंतर पोलिसांनी चार्जशीट कोर्टात पाठवायचे असते. मात्र, ते काम पुढे होत नसल्याने ही बोगस दुकाने सेटलमेंट करून सुरूच राहतात.
यादीवर नजर टाकली असता बहुतांश जणांवर फक्त एफआरआयच दाखल झालेला आहे. पुढची कारवाई झालेली नाही. काही जणांवर चार्जशीट दाखल केले आहे; मात्र ठोस कारवाई झालेली नाही. न्यायालयात आरोग्य अधिकारी हजर राहत नाहीत आणि तो बोगस डॉक्टर सुटतो.
विशेष म्हणजे, या डॉक्टरांना काही डिलर औैषधांचा पुरवठा करतात. त्यात शासनाने बंदी घातलेल्या औैषधांचाही समावेश असतो. त्यामुळे हा रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे यांची दुकाने कधी बंद होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे ‘विश्वास’घातकी कोण आहेत?
जुलैै २०१६च्या आरोग्य विभागाने दिलेल्या यादीवर नजर टाकली असता यात ३९ बोगस डॉक्टरांपैैकी १२ जण हे एकाच विश्वास या आडनावाचे आहेत. त्यांची पहिली नावे फक्त बदलली आहेत.
ही विश्वासघातकी टोळी कोणाची आहे, हे जरी पोलीस व आरोग्य विभागाने शोधून काढले व त्यांच्यावर कारवाई केली, तरी निम्मी दुकाने बंद होतील. तसेच, आणखी काही नावे ही एकाच अडनावाची आहेत.
फक्त एफआरआय दाखल असलेल्या
बोगस डॉक्टरांची नावे
शिरूर
बीला मंगल विश्वास (विठ्ठलवाडी)
कुमारेश चंद्र बाईन (करंदी)
गौैतम सुशांत मंडल (टाकळी)
प्रभास कुमार विश्वास (कोरेगाव भीमा)
बनसोडे (कोरेगाव भीमा)
ज्ञानेश्वर डेरे (मुखई)
खेड
किशोर खुशलानी
किशोर पटेल
अपूर्व कुमार रॉय
संजय विश्वास
नितीन कोकणे
दास
आशिषकुमार विश्वास
विश्वास
धीरज सरकार
सूरज सरकार
डेव्हिड
तडकल
विश्वास
दौैंड
अनूप मलिक (धुमाळ वस्ती)
प्रदीप सेन (दं.राजे)
वैरागी (पाटेठाण)
वैरागी (दहिटणे)
विश्वास
अनिल शेरखाणे
गौैतमकुमार रॉय
शेख (गलांडेवाडी)
आनंद डोंगरे
विश्वकुमार विश्वास
गणेश विश्वास
रॉय (राजेगाव)
बोगस डॉक्टर हा प्रकार समाजासाठी मोठा हानिकारक प्रकार आहे. ते बंदच झाले पाहिजे, यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. अधिकृत डॉक्टरांकडून एखादी केस गेली, तर त्याचे प्रमाणपत्र बाद केले जाते. त्याला शिक्षा होते. मात्र, प्रमाणपत्रच नसलेल्या या बोगस डॉक्टरांवर कारवाई होत नाही. दवाखाना सील केला जातो. तो मात्र पसार होतोे.
- रमेश टाकळकर, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे जिल्हा
आरोग्य विभागाने आता पुन्हा सर्व्हे केला आहे. त्यात काही तालुक्यांचा सर्व्हे आला असून, त्यात पाच जण बोगस डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. यात वेल्हे तालुक्यात एक व खेड तालुक्यात चार जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर एफआरआय दाखल करण्याच्या सूचना दिल्या असून काहींवर दाखलही केला आहे.
- भगवान पवार
आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद