थंडीच्या दिवसात उकडतंय; राज्यात ऐन हिवाळ्यात तापमानात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 03:13 PM2022-11-28T15:13:33+5:302022-11-28T15:13:54+5:30
महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली
पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा आणणारे ठरले आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात राज्यात उकाडा जाणवत आहे. ही परिस्थिती आणखी तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३३.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्यात किंचित वाढ झाली आहे. त्याचवेळी विदर्भात किंचित घट झाली आहे.
पुण्यात सध्या दिवसा, सायंकाळी आणि रात्री काही अंशी ढगाळ वातावरण अनुभवायला येत आहे. दिवसा अंशत: ढगांच्या उपस्थितीमुळे दिवसाच्या तापमानात कोणतीही घट होत नाही. परंतु रात्रीचे तापमान वाढत आहे. रात्रीच्या वेळी ढगांचे आवरण वातावरणात ब्लँकेट म्हणून काम करते. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या दीर्घ लहरी किरणोत्सर्गापासून वातावरणात जाण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होते.
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा तसेच दक्षिण-मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आर्द्रतेच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. तसेच पूर्वेकडील बंगालच्या उपसागरातून, दक्षिण द्वीपकल्पीय भागातून बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्याच्या प्रभावामुळे राज्यातील तापमानात वाढ होत आहे. ही परिस्थिती आणखी तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा थंडीत वाढ होऊ शकते.
रविवारी पुण्यात १८.१ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. पुढील तीन दिवस कमाल व किमान तापमान ३३/१७ अंशांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.