बॉलिवूडमुळे झाकोळली मराठी कलाकारांची प्रतिभा! ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 11:23 IST2025-01-07T11:23:32+5:302025-01-07T11:23:59+5:30

भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून खंत वाटते

Bollywood has eclipsed the talent of Marathi artists Only 52 Marathi artists have received Padma awards in 75 years | बॉलिवूडमुळे झाकोळली मराठी कलाकारांची प्रतिभा! ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार

बॉलिवूडमुळे झाकोळली मराठी कलाकारांची प्रतिभा! ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार

पुणे : देशामध्ये १९५४ ते २०२४ पर्यंत ५० जणांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले. यात चित्रपट आणि संगीत क्षेत्रांतील ७ जणांचा गौरव झाला. मराठी असलेल्या लता मंगेशकर यांचा त्यात समावेश आहे; पण भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळके यांना मात्र अद्याप ‘भारतरत्न’ देऊन गौरविण्यात आलेले नाही. तसेच महाराष्ट्रात बॉलिवूड कलाकारांना अधिक पद्म पुरस्कार मिळाले, त्यांच्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांकडे दुर्लक्ष होत आहे.

देशात महाराष्ट्रातील २६९ पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्यापैकी मराठी व्यक्ती केवळ ५२ आहेत. ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मभूषण तर पं. भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. हे अपवाद सोडता महाराष्ट्रात राहणाऱ्या परंतु मराठी नसलेल्या २१६ जणांना पद्म पुरस्कार दिले आहेत. ज्या मराठीत्तर व्यक्तींना पुरस्कार दिले गेले, त्यांच्या गुणवत्तेबाबत शंका नाही. या व्यक्ती सर्वस्वी पुरस्काराला पात्र आहेतच; परंतु महाराष्ट्राच्या नावावर २६९ संख्या दिसत असताना त्यात मराठी व्यक्ती केवळ ५२ आहेत, अशी खंत राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली. हेच तामिळनाडूत तब्बल १४७ पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. त्यात अन्य भाषक कोणीही नाही. कर्नाटकातील ४३ जणांना, आंध्र व तेलंगणाच्या ५९ जणांना, केरळच्या ५१ जणांना पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. या राज्यांचा आकार पाहता त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या अधिक दिसते. पश्चिम बंगाल व केरळमधील अनुक्रमे ७०, ५१ पद्म पुरस्कारार्थी आहेत. या राज्यातील कलाकारांची सांस्कृतिक जगतावर असलेल्या वर्चस्वाची साक्ष पटते.

महाराष्ट्रासाठी पद्म पुरस्कारांचा विचार करताना बॉलिवूड, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यक्ती व मराठी माणसांचा स्वतंत्रपणे विचार केला जावा, अशी मागणी आम्ही केली आहे. पद्म पुरस्कार येत्या काही दिवसांत जाहीर होतील, यावेळी खालील वास्तवाचा जरूर विचार करावा, अशी मागणी बाबासाहेब पाटील यांनी केली.

गेल्या ७५ वर्षांत कलाक्षेत्रातील २६९ पद्म पुरस्कारार्थी महाराष्ट्रातील असल्याचा आनंद आहे; पण यात केवळ ५२ मराठी कलाकारांचा समावेश आहे. सर्वोच्च भारतीय सन्मान असणाऱ्या ५० भारतीयांनंतरही फक्त एक मराठी कलाकार अर्थात गानसम्राज्ञी लतादीदींचे नाव आहे. आणि भारतीय चित्रपटसृष्टीला जन्म देणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा सर्वोच्च पुरस्कारासाठी अद्याप विचारही झालेला नाही, हे पाहून खंत वाटते. बॉलिवूडमधील कलाकारांचा आदर असला तरी केवळ महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या अमराठी कलाकारांना पुरस्कारांत झुकते माप दिले जाते, हा मराठी कलाकारांच्या प्रतिभेचा अनादर आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल. -बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग

Web Title: Bollywood has eclipsed the talent of Marathi artists Only 52 Marathi artists have received Padma awards in 75 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.