प्रेयसीच्या घरासमोर फोडला बॉम्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:03 AM2018-08-11T01:03:27+5:302018-08-11T01:03:37+5:30

प्रेमभंग केल्याने प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी वडकी येथील दोन तरुणांनी धायरी येथील डीएसके विश्व रोड परिसरात बॉम्बसदृश वस्तूने स्फोट केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.

Bomb blasted in front of the lover's house | प्रेयसीच्या घरासमोर फोडला बॉम्ब

प्रेयसीच्या घरासमोर फोडला बॉम्ब

googlenewsNext

पुणे : प्रेमभंग केल्याने प्रेयसीला धडा शिकविण्यासाठी वडकी येथील दोन तरुणांनी धायरी येथील डीएसके विश्व रोड परिसरात बॉम्बसदृश वस्तूने स्फोट केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
या तरुणांनी फटाक्यातील दारू माचीसारख्या बॉक्समध्ये भरून, तसेच त्यामध्ये बॉल बेअरिंग टाकून हा स्फोट घडवला होता. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ससे, हरीण, डुक्कर असे प्राणी मारण्यासाठी शिकारी अशा प्रकारच्या बॉम्बचा वापर करतात. याला डुक्कर बॉम्ब असेही संबोधले जाते.
किशोर आत्माराम मोडक (वय ३०) व अक्षय राजाभाऊ सोमवंशी (वय २४, रा. वडकी, सासवड रोड, पुणे)
अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ३ वाजता फटाक्यासारख्या आवाजाने धायरी डीएसके विश्व रोड परिसर हादरला होता. स्फोटात येथील सोसायटीतील एका घराच्या खिडकीची काचदेखील फुटली होती. या घटनेनंतर धायरी परिसरात बॉम्बस्फोट झाल्याची अफवा पसरली होती. याची खबर सिंहगड पोलिसांना मिळाल्यावर ते तत्काळ घटनास्थळी पोहोचले होते. घटनास्थळी पोलिसांना काही छर्रेदेखील सापडले होते. यामुळे ही बाब गांभीर्याने घेत घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दोन तरुण बॉम्बसदृश वस्तू घराच्या खिडकीवर फेकून चारचाकी वाहनातून पळताना दिसले होते. हे दोघे ज्या चारचाकी गाडीतून आले, त्या गाडीचा शोध घेऊन दोघांना वडकी येथून ताब्यात घेतले.
स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता
यादव, महिला सहायक पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, फौजदार गिरीश सोनवणे, कर्मचारी रफीक नदाफ, टकले, दयानंद तेलंगे पाटील, मयूर शिंदे, श्रीकांत दगडे,
सचिन माळवे, नीलेश कुलथे, दत्ता सोनवणे, यशवंत ओंबासे, संतोष सावंत, राहुल शेडगे, नीलेश जमदाडे, हरीष गायकवाड, उमेश फणसे यांनी अटक केली.
>दोन वर्षे होते प्रेमसंबंध
गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी एस्टार चारचाकी गाडीदेखील हस्तगत केली आहे. मोडक याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी या प्रकारची माहिती पोलिसांना दिली. मोडक याचे डीएसके रोड येथे राहत असलेल्या मावशीकडे नेहमी येणे-जाणे होते. त्यातूनच शेजारी राहणाऱ्या एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. दोन वर्षांनंतर त्यांचा प्रेमभंग झाला. संबंधित मुलीने त्यांच्याशी बोलणे तसेच भेटणेही टाळले. यामुळे तरुणीला धडा शिकविण्यासाठी त्याने हे कृत्य केले.
मोडकचा मावसभाऊ कुत्र्यांना मारण्यासाठी, तसेच शिकारीसाठी अशा प्रकारचा बॉम्ब बनवत होता. त्याच्याकडूून थोडीफार माहिती घेऊन त्याने फटाक्याची दारू मोठ्या प्रमाणावर एकत्र करून काडीपेटीच्या आकाराच्या पुठ्ठ्यात भरली. यानंतर त्यात एमसीलद्वारे बॉल बेअरिंग टाकून वात लावली. वात पेटवल्यानंतर तरुणी राहत असलेल्या घराच्या परिसरात हा बॉम्ब टाकण्यात आला.

Web Title: Bomb blasted in front of the lover's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.