पौडमधील वन क्षेत्रपाल कार्यालयात बॉम्बस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 09:32 AM2019-06-05T09:32:42+5:302019-06-05T18:13:41+5:30
पौड येथील वन क्षेत्रपाल कार्यालयात जप्त करुन ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन कार्यालयाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पिरंगुट : पौड (ता.मुळशी) येथील ताम्हिणी वनक्षेत्रपाल कार्यालयामध्ये अवैधपणे शिकार करीत असलेल्या शिकाऱ्यांकडून वन्यप्राण्यांना मारण्यासाठी वापरण्यात येत असलेले गावठी बॉम्ब हे वनक्षेत्रपाल विभागाच्या वतीने जप्त करुन ते बॉम्ब पौड येथील त्यांच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते. परंतु, याच गावठी बॉम्बचा बुधवारी सुमारे पहाटे चार ते पाचच्या आसपास मोठा स्फोट झाला.
प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुका व ताम्हिणी घाटाच्या भोवताली असलेला मोठा अभयारण्य परिसर असून या परिसरामध्ये रान डुक्कर किंवा इतर प्राण्यांची शिकार ही केली जात असते तेव्हा ही शिकार करण्यासाठी शिकाऱ्यांकडून गावठी बॉम्बचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो तेव्हा गेल्या पाच ते सहा महिन्यापूर्वी शिकार करण्याच्या अनुषंगाने आणलेले गावठी बॉम्ब हे ताम्हिणी अभयारण्य वनक्षेत्रपालच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने जप्त करण्यात आले होते व हे जप्त केलेले जवळपास नव्वद गावठी बॉम्ब हे पौड येथे असलेल्या वनक्षेत्रपाल विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते परंतु बुधवारी पहाटे चार ते पाच सुमारास याच गावठी बॉम्बचा मोठा जोरदार स्फोट झाला असून सुदैवाने या स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गावठी बॉम्बचा झालेला स्फोट हा मानवी वस्तीमध्ये झालेला आहे. कारण ताम्हिणी अभयारण्य वनक्षेत्रपाल विभागाचे असलेले हे कार्यालय सुरेश बारमुख यांच्या मालकीच्या बिल्डिंग मध्ये भाडेतत्वावर पौड या ठिकाणी पुणे कोलाड रस्त्याच्या कडेलाच असून या कार्यालयाच्या वरती व खाली तसेच आजूबाजूला कुटुंब वास्तव्यास आहेत तेव्हा हा स्फोट सुदैवाने पहाटेच्या सुमारास झाल्याने या मध्ये खूपच मोठी हानी टळली आहे ?
या झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये कार्यालयाचे दोन्ही दरवाजे तुटून वीस ते तीस फूट लांब मुख्य रस्त्यावर येऊन पडले होते तर शटरच्या आत मध्ये लावलेली मोठी काच फुटून साधारणपणे चाळीस फूट लांब जाऊन सर्वत्र विखुरली होती दोन शटरच्या मधोमध असलेली भिंत सुद्धा तुटून पडली होती तर कार्यालयामध्ये वरती लावण्यात आलेला पंखा सुद्धा पूर्णपणे वाकडा झाला होता तर कार्यालयाच्या खिडक्यासुद्धा तुटून पडल्या होत्या व आत मध्ये असलेल्या खांबाला तडे गेलेले असून टेबल,कपाटे व कार्यालयीन साहित्य इतरत्र फेकले गेले होते तर कार्यालयाच्या आतील सर्व कपाटे ही विखुरले गलीे होती तेव्हा या सर्व गोष्टींवरून या झालेल्या स्फोटांची तीव्रता समजून येते पण हा नागरी वस्तीमध्ये झालेला स्फोट पहाटे चार ते पाच दरम्यान झाला म्हणून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही पण हा स्फोट दिवसा झाला असता तर यामध्ये खूप मोठे व कधीही न भरून येणारे नुकसान झाले असते.
या स्फोटानंतर पुणे बॉम्ब निकामी पथक हे श्वानपथकासह या घटनेच्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी स्फोटाच्या ठिकाणची कसून तपासणी करत तुटलेल्या व अस्तवेस्त झालेल्या सर्व वस्तू व्यवस्थित तपासून कार्यालयाच्या बाहेर काढल्या. या स्फोटाची माहिती मिळताच ताम्हिणी वनक्षेत्रपालच्या अधिकारी अंकिता तरडे, सई भोरे पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ ,पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, महेश मोहिते, पोलिस कर्मचारी संजय तुपे,संदीप सपकाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीयपोलीस अधिकारी सई भोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विवेक पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला आहे. पौड येथील ताम्हिणी वनक्षेत्रपालच्या कार्यालयामध्ये जी काय दुर्घटना घडली ती दुर्घटना खूपच दुर्दैवी आहे व ती दुर्घटना कशी घडली व कशामुळे घडली याची आम्ही पूर्णपणे चौकशी करीत असून चौकशी अंती आम्ही योग्य तो निर्णय घेऊ अशी माहिती सहाय्यक वनसंरक्षक पुणे मधुकर तेलंग यांनी दिली