दहशतवाद्याकडून बॉम्ब बनविण्याचे केमिकल जप्त; दहशतवादविरोधी पथकाने शाेधली प्रयोगशाळा उपकरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 10:45 AM2023-08-01T10:45:48+5:302023-08-01T10:46:20+5:30
कोथरूड पोलिसांनी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (२३) आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (२४, दोघेही रा. रतलाम) यांना अटक केली होती.
पुणे : कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी मोहम्मद युसूफ खान या दहशतवाद्याने लपवून ठेवलेले बॉम्ब बनविण्याचे केमिकल्स व लॅब इक्वीपमेंट (प्रयोगशाळा उपकरणे) दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जप्त केली आहेत.
कोथरूड पोलिसांनी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (२३) आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (२४, दोघेही रा. रतलाम) यांना अटक केली होती. त्यांना कोंढव्यात आश्रय देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (३२, रा. कोंढवा) आणि आर्थिक मदत करणारा सिमाब नसरुद्दीन काझी (२७, रा. कौसरबाग, कोंढवा, मूळ रा. पणदेरी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) याला रत्नागिरीतून अटक करण्यात आली. या चौघांना न्यायालयाने ५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
अधिक चौकशी केली असता दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनविण्यासाठी आवश्यक साहित्य, ज्यामध्ये केमिकल पावडर, चारकोल, थर्मामीटर, ड्रॉपर, सोल्ड्रिंग गन, मल्टी मीटर, छोटे बल्ब, बॅटऱ्या, अलार्म क्लॉक असे साहित्य जप्त केले होते. काझी याने खरेदी केलेले थर्मामीटर, ड्रॉपर, पिपेट ज्या ठिकाणाहून खरेदी केले होते, ती ठिकाणे त्याने दाखविली आहेत. त्याबाबत संबंधितांकडे तपास करण्यात आला आहे.
- या तपासादरम्यान इम्रान खान याने बॉम्ब बनविण्यासाठी विविध केमिकल व लॅब इक्वीपमेंट एका ठरावीक ठिकाणी लपवून ठेवले होते. हे केमिकल्स व प्रयोगशाळा उपकरणे ठेवलेले ठिकाण खान याने दाखविले. एटीएसच्या पथकाने हे साहित्य जप्त केले आहे.