पुणे स्थानकात बॉम्ब ठेवलाय, लोकेशन हवं असल्यास ७ कोटी द्या; कंट्रोल रुमला कॉल आला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 10:20 PM2022-05-03T22:20:12+5:302022-05-03T22:20:26+5:30
रमजान ईदचा दिवस, त्यात भोंग्यांवरून वाद सुरू असताना पोलीस कंट्रोल रुमला कॉल आला
पुणे : पोलीस नियंत्रण कक्षातील ११२ या क्रमांकावर एका व्यक्तीने फोन करुन रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवला आहे. त्या बॉम्बचे नेमके लोकेशन हवे असेल तर ७ कोटी रुपये द्यावे लागतील, असा सांगितले गेले. रमजान ईदचा दिवस, त्यात भोंग्यांवरून सुरु असलेला वाद यामुळे राज्यात तणावाचे वातावरण असताना असा फोन आल्याने संपूर्ण पोलीस दलाची एकच धावपळ उडाली. हा कॉल वाघोली परिसरातून आला असल्याचे ११२ वरुन याची माहिती तातडीने पुणे शहर पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने पोलीस तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाने शहरातील सर्व रेल्वे स्थानकावर धाव घेतली. संपूर्ण परिसर श्वान पथकासह पिंजून काढला. मात्र, कोणतीही आक्षेपार्ह वस्तू अथवा बॉम्ब आढळून आला नाही.
दरम्यान, एकीकडे तपासणी सुरु असताना त्या कॉलरचा शोध घेण्याचे काम सुरु होते. ज्या मोबाईलवरुन त्याने कॉल केला होता. तो जालना येथील ठाकूर नावाच्या व्यक्तीचा असल्याचे आढळून आले. पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले. तेव्हा त्याने आपला फोन चोरीला गेला असल्याचे सांगितले. त्याचवेळी पोलीस अधिकार्यांनी या कॉलरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने मोबाईल बंद केल्याचे आढळून आले आहे.
याबाबत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले की, हा कॉल ११२ वर आला होता. तेथून आपल्या नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले. पोलिसांनी सर्वत्र तपासणी केली. मात्र, अशी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. या कॉलरचा ठावठिकाणा मिळाला असून त्याचा शोध सुरु आहे.