आंबेगावमध्ये बोगस उतारे
By admin | Published: November 3, 2014 05:07 AM2014-11-03T05:07:59+5:302014-11-03T05:07:59+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील काही गावांमध्ये सातबारा, आठ ‘अ’ व उत्पन्नाच्या दाखल्यांवर बोगस सही-शिक्के मारून कागदपत्रे बनविण्याचे प्रकार घडत आहेत.
घोडेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील काही गावांमध्ये सातबारा, आठ ‘अ’ व उत्पन्नाच्या दाखल्यांवर बोगस सही-शिक्के मारून कागदपत्रे बनविण्याचे प्रकार घडत आहेत. तहसील कचेरीत उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आलेल्या कागदपत्रांमधून ही गंभीर बाब उघड झाली आहे. या प्रकरणांची चौकशी करून आरोपींवर गुन्हे दाखल करणार असल्याचे तहसीलदार बी. जी. गोरे यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील लोकांसाठी शासनाच्या शेती, वैयक्तिक लाभाच्या अशा अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सातबारा, आठ अ, उत्पन्नाचे दाखले सतत लागत असतात. हे दाखले मिळविण्यासाठी सर्कल, तलाठी, कोतवाल यांच्याकडे जायला लागू नये, यासाठी काही लोकांनी तलाठ्याचे शिक्के बनवून घेतले आहेत. जुन्या उताऱ्यांची झेरॉक्स काढून त्यावर घरच्या घरीच सही-शिक्के मारून अथवा गावात एखाद्याकडून सही-शिक्के मारून घेऊन सातबारा, आठ अ, तलाठ्याचे उत्पन्नाचे दाखले सर्रास वापरले जात आहेत.
असे प्रकार घडत असल्याचे तहसीलदार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कचेरीत येणाऱ्या प्रकरणांची चौकशी केली. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी कचेरीत आलेल्या पंचाळे बुद्रुक येथील दत्तात्रय भोरू तारडे व आसाणे येथील नामदेव बुधा शेळकंदे यांच्या प्रकरणाला बोगस सही व शिक्के मारलेला सातबारा, आठ अ व तलाठ्याचा उत्पन्नाचा दाखला असल्याचे आढळून आले. हे उतारे स्वत: अर्जदाराने बनविले की कोणाकडून बनवून घेतले, याचा खुलासा अर्जदाराकडून तहसीलदार यांनी मागितला असून,
याबाबत खुलासा प्राप्त होताच दोषींवर गुन्हा दाखल करणार असल्याचे तहसीलदार बी. जी. गोरे यांनी सांगितले. (वार्ताहर)