दादर स्टेशनवर बॉम्ब; पुणे पोलिसांना फोन, बॉम्ब शोधक पथकाकडून तातडीने स्टेशनची तपासणी
By विवेक भुसे | Published: July 18, 2023 05:01 PM2023-07-18T17:01:24+5:302023-07-18T17:01:33+5:30
पुण्याच्या कदम वाक वस्ती येथील एका हॉटेलमधील एका वेटरने हा फोन केल्याचे चौकशीत समोर
पुणे : पुणेपोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला. दादर जंक्शन रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवला असल्याचे त्या फोन करणाऱ्याने सांगितले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तातडीने संपूर्ण दादर रेल्वे स्टेशनची तपासणी केली. त्यात काहीही आक्षेपार्ह मिळाले नाही. त्याचवेळी पुणे पोलिस फोन करणाऱ्याचा शोध घेत होते. कदम वाक वस्ती येथील एका हॉटेलमधील एका वेटरने हा फोन केल्याचे लक्षात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर वेगळीच माहिती समोर आली. पोलिसांनी योगेश शिवाजी ढेरे (वय ३५, रा. गोखलेनगर) याला अटक केली.
याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले की, योगेश ढेरे याचा सात ते आठ वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्या अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यातून त्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे. तो कायम बॉम्ब फुटणार असे बोलत असतो. त्यातूनच त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्याचे दिसून आले आहे. या सर्व प्रकारामध्ये पुणे आणि मुंबई पोलिसांची मात्र धावपळ उडाली.