कीर्तनकारांच्या तारखा झाल्या ‘बुक’
By admin | Published: June 21, 2015 12:47 AM2015-06-21T00:47:21+5:302015-06-21T00:47:21+5:30
सध्या अधिक मास सुरू असून, या दिवसांत हरिनाम सप्ताह आयोजित करण्याची प्रथा आहे. सप्ताहातील दिवसभराच्या कार्यक्रमात कीर्तनाला विशेष महत्त्व असल्याने अनेक
मंगेश पांडे , पिंपरी
सध्या अधिक मास सुरू असून, या दिवसांत हरिनाम सप्ताह आयोजित करण्याची प्रथा आहे. सप्ताहातील दिवसभराच्या कार्यक्रमात कीर्तनाला विशेष महत्त्व असल्याने अनेक कीर्तनकारांच्या महिन्याभराच्या तारखा अगोदरच बुक झाल्या आहेत.
अधिक मास हा महिना धार्मिक कार्यक्रमांसाठी शुभ मानला जातो. या महिन्यात ठिकठिकाणी अन्नदान आणि हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात. सप्ताहामध्ये कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन घेतले जाते. या दिवसभराच्या कार्यक्रमात विशेषत: कीर्तनासाठी नागरिकांची अधिक गर्दी असते. याच कीर्तनकारांचे सध्या दिवसाचे ‘शेड्यूल्ड पॅक’ आहे. कीर्तनकारांना मानधन दिले जाते. जास्तीत जास्त मानधन देणारे आयोजकदेखील आहेत.
ग्रामीण भागातील गावांमध्ये नेहमीचे कीर्तनकार ठरलेले असतात. त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना सांगितले जात नाही. तिथीदेखील या कीर्तनकारांना माहिती असतात. गावकऱ्यांकडूनही संबंधित कीर्तनकाराचा योग्य सन्मान राखला जातो.
कीर्तनकारांना साथसंगत देण्यासाठी पखवाजवादक, वीणेकरी, टाळकरी, गायक यांचीही आवश्यकता असते. या सर्वांचा एक संचच असतो. सध्या हे संचदेखील उपलब्ध होत नाहीत. बहुतेक संच वारकरी शिक्षण संस्थेतील असतात. सप्ताहाचे सात दिवस त्यांना ठरवून दिलेले असतात. मात्र, सध्या वारकरी शिक्षण संस्थेतही संच मिळत नसल्याने आयोजकांना पळापळ करावी लागत आहे.
ज्ञानेश्वरी, गाथा यांसह विविध ग्रंथांचा अभ्यास करून ज्ञान आत्मसात केले जाते. यामागे वर्षानुवर्षांची मेहनत असते. यातून मिळणाऱ्या ज्ञानातून कीर्तनकार घडतो. हेच कीर्तनकार आपल्या कीर्तनातून संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून संपर्क वाढविला आहे.
कीर्तनाचे धडे
वारकरी प्रशिक्षण संस्थेत कीर्तनाचे धडे दिले जातात. प्रशिक्षणार्थी कीर्तनकारदेखील काही ठिकाणी कीर्तन करताना दिसतात. अनेक बालकांना याबाबत आवड निर्माण होऊ लागली आहे. देहू, आळंदीसह पुणे व परिसरात सुमारे दहा हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. कीर्तन प्रशिक्षणासाठी विविध संस्थांमार्फतही वर्ग घेतले जात आहेत. त्याचा फायदा अनेक जण घेत आहेत. कीर्तनकारांमध्ये तरुण कीर्तनकारांचीही संख्या वाढली आहे. तसेच श्रोत्यांमध्येही तरुण चेहरे वाढले आहेत.