पुस्तकांचे गाव आता एका क्लिकवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 07:01 AM2018-05-03T07:01:57+5:302018-05-03T07:01:57+5:30
वाचनसंस्कृती जपणारी संस्कारक्षम पिढी तयार व्हावी, यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकाराने महाबळेश्वरजवळील भिलार येथे देशातील पहिलेवहिले पुस्तकांचे गाव साकारले
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : वाचनसंस्कृती जपणारी संस्कारक्षम पिढी तयार व्हावी, यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकाराने महाबळेश्वरजवळील भिलार येथे देशातील पहिलेवहिले पुस्तकांचे गाव साकारले. मात्र, भिलार अद्याप इंटरनेटच्या जगात अवतरलेले नव्हते. वर्षपूर्तीनिमित्त हे पुस्तकांचे गाव आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. भिलारची इत्थंभूत माहिती देणारे संकेतस्थळ लवकरच पर्यटक, वाचकांच्या भेटीला येत आहे. संकेतस्थळाचा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असून त्या माध्यमातून पुस्तकांच्या गावाला पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला आहे. वर्षपूर्तीचे औैचित्य साधून प्रकल्पामध्ये आणखी पाच घरांचा समावेश करण्यात आला असून, अॅम्फी थिएटरचे लोकार्पण होणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह गुजराथी पुस्तकेही समाविष्ट केली जाणार आहेत.
भिलारच्या संकेतस्थळाचे काम तीन-साडेतीन महिन्यांपासून सुरू होते. यासाठी सुमारे ७०-७५ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. वर्षपूर्तीनिमित्त २५ घरांमध्ये आणखी ५ घरांची भर घालण्यात आली आहे. पुस्तकांच्या गावी वाचनाबरोबरच साहित्यातील विविध प्रकारांची ओळख व्हावी, यादृष्टीने अभिवाचन, नाट्य सादरीकरण अशा विविध साहित्यविषयक कार्यक्रमांसाठी साकारलेल्या मुक्त मंचाचे अनावरणही होणार असल्याची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक आनंद काटीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
एक हजार पुस्तके उपलब्ध करुन देणार
पुस्तकांच्या गावात मराठी, हिंदी आणि इंग्रजीसह गुजराथी साहित्य उपलब्ध होणार आहे. यासाठी बडोदा येथील मराठी वाङ्मय परिषदेशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून गुजरातमधील साहित्यिकांशी बोलणी सुरू असून, सुमारे १,००० गुजराथी पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.