स्मृतिचिन्हाऐवजी पुस्तकांची भेट
By admin | Published: November 23, 2015 12:41 AM2015-11-23T00:41:41+5:302015-11-23T00:41:41+5:30
महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या पाहुण्यांना हारतुरे, स्मृतीचिन्ह भेट देण्याऐवजी विचारधन असलेली पुस्तके देऊन स्वागत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी घेतला आहे
पुणे : महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी येणाऱ्या पाहुण्यांना हारतुरे, स्मृतीचिन्ह भेट देण्याऐवजी विचारधन असलेली पुस्तके देऊन स्वागत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी घेतला आहे. या अभिनव उपक्रमाचे अनुकरण संपुर्ण शहराने करून एक चांगला आदर्श पुण्याने घालून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉलनुसार शहरातील सर्व खासदार, आमदार, सर्व गटनेते व इतर पदाधिकारी यांचे नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये घालावे लागते. त्याचबरोबर प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांच्या स्वागतासाठी स्मृतीचिन्ह आणले जाते. पालिकेच्या कार्यक्रमांना सर्व आमदार व पदाधिकारी कधीच उपस्थित राहत नाहीत, मात्र प्रोटोकॉलनुसार स्मृतीचिन्हांची खरेदी करावीच लागते. अशी न दिली गेलेल्या स्मृतीचिन्हांनी एक रूम भरली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. यापार्श्वभुमीवरच पालिकेच्या कार्यक्रमांसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत पुस्तकांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)