गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसासाठी दीड लाख मोदकांचे ‘बुकिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:26+5:302021-09-05T04:14:26+5:30
प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवात गणपतीला पारंपरिक पद्धतीने उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये ...
प्रज्ञा केळकर-सिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवात गणपतीला पारंपरिक पद्धतीने उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये मोदकांमध्ये गुलकंद, आंबा, पंचखाद्य, खवा असे वैविध्य पहायला मिळत आहे. हातवळणीच्या उकडीच्या मोदकांच्या माध्यमातून घरगुती व्यवसायाला चालना मिळत आहे. पुण्यातील सुगरणींच्या मोदकांचा प्रवास ‘लोकल ते ग्लोबल’ झाला आहे. शहरात दहा हजारांहून अधिक महिला, तसेच पुरुषही मोदकांच्या व्यवसायात असून यातून दरवर्षी एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होते. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाजे दीड लाख मोदकांची शहरात विक्री होते.
पुण्यातून फ्रोजन मोदकांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गूळ, नारळ, वेलदोडा, खसखस यांचे सारण आणि तांदळाची उकड यापासून तयार केलेले हातवळणीचे उकडीचे मोदक उणे १८ डिग्री सेल्शिअसमध्ये ‘ब्लास्ट फ्रिजिंग’ पद्धतीने साठवले जातात आणि वाहतूकही याच तापमानात केली जाते. फ्रोजन मोदक एक वर्ष टिकू शकतात. एका मोदक ११ ते १३ पाऱ्यांचा असून त्याचे वजन ६० ते ७० ग्रॅम असते आणि त्याची किंमत साधारणपणे २५-३० रुपये असते. मराठवाडा, विदर्भामध्ये तळणीच्या मोदकांना जास्त पसंती दिली जाते, अशी माहिती महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी ‘लोकमत’ला दिली.
----------------------------
हातवळणीच्या उकडीच्या मोदकांच्या माध्यमातून घरगुती व्यवसायासाठी उत्पन्नाचे चांगले साधन निर्माण झाले आहे. हातवळणीचे मोदक अत्यंत कौशल्याचे आणि सरावाचे काम असते. पती, पत्नी, मुले, घरातील ज्येष्ठ नागरिक असे सर्व कुटुंब मिळून या व्यवसायाला हातभार लावतात. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ७ ते ११ या वेळेत पुण्यात मोदकांची सर्वाधिक विक्री होते. त्यासाठी आदल्या दिवशी रात्रभर जागरण करून ऑर्डर पूर्ण केल्या जातात. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपासून मागणी १० टक्क्यांपर्यंत कमी होते. गौरी जेवणाच्या दिवशी २०-२५ टक्के मागणी असते. गेल्या २० वर्षांपासून आपण महिलांना हातवळणीच्या उकडीच्या मोदकांचे प्रशिक्षण देत आहोत. यावर्षी ३५० महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. पुरुषांचाही या व्यवसायात सहभाग असतो.
- किशोर सरपोतदार, अध्यक्ष, महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन
----------------------------
“हातवळणीच्या उकडीच्या मोदकांचे बुकिंग गेल्या महिन्यापासूनच सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. बरेचदा उकडीच्या मोदकांमध्ये मैदा वापरून ते टिकाऊ केले जातात. हातवळणीचे मोदक थोडे जाड असतात. त्यामध्ये रंगीत मोदक, केशरकाड्यांची सजावट असे वैविध्य असते. तळणीच्या मोदकांना गणेश मंडळांकडून जास्त मागणी असते. काही ठिकाणी साचा किंवा मशीनच्या सहाय्याने मोदक केले जातात. दररोज २०० ते ५०० मोदकांची ऑर्डर असते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये एकादशी आल्यास खडीसाखर, खवा, खारीक, खोबरे आणि खसखस अशा पंचखाद्याच्या मोदकांना मागणी असते. आंबा पल्प, खवा, इसेन्स अशा पद्धतीनेही मोदक तयार केले जातात. एका मोदकाची किंमत २५-३० रुपयांच्या दरम्यान असते.”
-प्राजक्ता भोसले, घरगुती महिला उद्योजक
-----------------------
नारळाचे मोदक परदेशात पाठवणे शक्य नसते. मात्र, खव्याचे, आंब्याचे, चॉकलेटचे मोदक अमेरिका, यूके, कॅनडा, युरोप अशा देशांमध्ये पाठवले जातात. एका दिवसात १५ ते २०, तर आठवड्याला साधारणपणे परदेशातील १०० ऑर्डर पूर्ण केल्या जातात. तळणीचे मोदकही बाहेरच्या देशांमध्ये पाठवता येऊ शकतात.
- आशिष पाळंदे, पाळंदे कुरिअर्स
---------------------------
चौकट :
एका मोदकाची किंमत : ३० रुपये
मोदकाच्या पाऱ्या : नऊ, अकरा, तेरा, वीस, एकवीस
एका मोदकाचे वजन : ६० ते ७० ग्रॅम
तळणीचे मोदक : ३०० ते ३५० रुपये किलो
खोवलेला नारळ : २५० रुपये किलो