Ganeshotsav 2022: आतुरता गणरायाच्या आगमनाची..! पुण्यात बाप्पाच्या मुर्त्यांची बुकिंग सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 10:36 AM2022-07-20T10:36:55+5:302022-07-20T10:49:43+5:30
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मुर्त्यांचे प्रमाण सर्वाधिक
शिवानी खोरगडे
पुणे: गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सणउत्सव निर्बंधात साजरे करावे लागले. पण यंदाच्या वर्षी निर्बंध मुक्त झाल्यानं सर्वच धर्मीय सणउत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे करत आहेत. पुढच्या महिन्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. कारण दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात गणेशोत्सव साजरा करावा लागला होता. त्यामुळे दोन महिन्यांआधीच शहरात वातावरण तयार झालं आहे. गणेशोस्तवासाठी लागणाऱ्या मुर्त्यांचं काम हे अंतिम टप्प्यात आलं आहे. पण यंदा महागाईचा फटका हा मुर्त्यांवर बसला असून १० टक्के वाढ ही मुर्त्यांच्या किंमतीत झाली आहे.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधात गणेशोत्सव साजरा केला गेला. पण यंदा निर्बंध मुक्त झाल्याने शहरात गणेशोत्सव मंडळ तसेच नागरिक गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहे. गणेशोत्सवासाठी बाप्पाच्या मूर्तीचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. दोन वर्ष ५० टक्क्यांपेक्षा कमी मूर्ती विकल्या गेल्याने आर्थिक संकटात असलेल्या मुर्तीकारांना यंदा मात्र अच्छे दिन येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
महागाईचा मूर्ती विक्रीवर देखील फटका
गेल्या काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू तसेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. वाढत्या महागाईमुळे मूर्तीसाठी लागणारे साहित्य देखील महाग झाल्याने यंदा मुर्त्यांच्या किंमतीमध्ये दहा टक्के एवढी वाढ झाली आहे. तसेच यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पीओपीच्या मुर्त्यांचा प्रमाण हे अधिक असल्याचं यावेळी मूर्ती विक्रेते श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय.
यंदाही पुणे शहरात मानाचे गणपती, दगडूशेठ, विठ्ठलाच्या मूर्तीचा क्रेझ
डिसेंबर महिन्यापासूनच मूर्तिकार हे बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी तयारीला लागतात. पण मागील दोन वर्ष कोरोनामुळे बाप्पाच्या मूर्ती हे कमी प्रमाणात विक्रीला गेल्याने ५० टक्के मुर्त्या शिल्लक होत्या. तर काही नवीन मुर्त्या देखील यंदाच्या वर्षी बनविण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षी देखील पुणे शहरात मानाच्या बाप्पाच्या मूर्ती तसेच दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती आणि विशेष करून विठ्ठलाच्या मूर्तीचा क्रेझ असून नागरिक आतापासूनच मूर्तीसाठी बुकिंग करत आहेत.